वातावरणात होतोय कमालीचा बदल; ढगाळ वातावरणामुळे तापमानात घट, वादळी पावसाचीही शक्यता
पुणे : गेल्या आठवडाभरापासून पुणे शहर आणि परिसरात उष्णतेने कहर केला असून, बहुतांश वेळा तापमानाने 41 डिग्रीचा टप्पा ओलांडला आहे. बुधवारी तापमानाचा पारा आणखी वाढल्याने नागरिकांचे हाल झाले. मधेच ढगाळ वातावरण आणि मधेच कडक ऊन पडत असल्याने उन्हाचा चटका आणि घामाच्या धारांमुळे पुणेकरांचा जीव कासावीस होत आहे. दरम्यान, हवामान विभागाने पुणेकरांसाठी सुखद बातमी दिली असून, येत्या दोन-तीन दिवसांत तापमानात घट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
बुधवारी तापमानाचा कहर एवढा भीषण होता की, नागरिकांना घराच्या बाहेर पडणे काठीण झाले होते. चाकरमान्यांनी सकाळी ऑफीसमध्ये गेल्यानंतर बाहेर पडणे टाळले. गेल्या आठवडाभरापासून शहरातील मुख्य रस्त्यांवर संचारबंदीसारखी परिस्थिती दिसत आहे. दुपारच्या शहरातील बहुतांश रस्त्यांवर शुकशुकाट दिसत होता. डोक्यावर आणि तोंडाला रुमाल बांधून नागरिक उष्णतेच्या काहिलीपासून स्वत:चा बचाव करताना दिसत होते. एका बाजूला कमाल तापमान वाढत असतानाच किमान तापमानही 20 अंशांपार्यंत वाढल्याने सायंकाळी आणि रात्रीही नागरिकांना चैन पडताना दिसत नाही.
उष्णतेच्या लाटेमुळे होणाऱ्या संभाच्या आजारांच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांच्या रुग्णालयांनी आणि शासकीय रुग्णालयांच्या स्तरावर उपाययोजना केल्या आहेत. उष्णतेच्या लाटेचा विचार करता आरोग्य विभगाच्यावतीने अलर्ट जारी करण्यात आला असून, डॉक्टरांना सूचना देण्यात आल्या आहेत. वृद्ध आणि गर्भवतींना उष्णतेच्या विकारांचा मोठा धोका संभवतो, या पार्श्वभूमीवर कुटुंबातील अशा सदस्यांची विशेष काळजी घेण्याची सूचना वैद्यकीय तज्ज्ञांनी केली आहे.
उष्णतेच्या लाटेपासून सावधगिरी गरजेची
उष्णतेच्या लाटेपासून वाचण्यासाठी सावधानता बाळगणे हाच सर्वात चांगला उपाय आहे. नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी अलर्ट जारी करण्यात आला असून, नागरिकांनी कडक उन्हापासून वाचण्यासाठी काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.