ठाणे / स्नेहा जाधव,काकडे : पावसाळी ऋतू म्हणजे निसर्गाची संपत्ती खुली होण्याचा काळ. याच काळात डोंगरदऱ्यांत, जंगलाच्या कुशीत नैसर्गिकरीत्या उगम पावणाऱ्या रानभाज्यांचे आरोग्यदायी महत्त्व अधोरेखित करण्यासाठी ठाण्यात ‘रानभाजी महोत्सव’ आयोजित करण्यात आला. बी. जे. हायस्कूल, टेंभी नाका येथे पार पडलेल्या या उपक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद, ठाणे व उमेद ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत करण्यात आले.
रानभाज्या म्हणजे निसर्गाची आरोग्यवर्धक भेट! आघाडा, शेवाळा, कुरकुरी, मायाळू, टाकळा, करटोली, कवळाकवळी, विंडा, सुरण अशा अनेक दुर्मिळ भाज्यांचे यावेळी प्रदर्शन आणि विक्री करण्यात आली. शहरी भागात सहज न मिळणाऱ्या या पारंपरिक भाज्यांमध्ये रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्याचे औषधी गुणधर्म असून, त्यांचा समावेश आहारात केल्यास आरोग्यास मोठा फायदा होतो, असा आरोग्यदृष्टिकोन या महोत्सवात मांडण्यात आला.
या उपक्रमाबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे म्हणाले, “ग्रामीण भागातील महिलांना रोजगार, शहरी भागातील नागरिकांना आरोग्य – अशा दुहेरी उद्देशाने दरवर्षी रानभाजी महोत्सवाचे आयोजन केले जाते. यंदाच्या महोत्सवात २५ हून अधिक रानभाज्यांचे प्रदर्शन व विक्री झाली. अनेक भाज्या अशा आहेत ज्यांची आपल्याला माहितीही नसते, त्या भाज्यांचे महत्त्व आणि उपयोग सांगणारी तसेच त्यातून तयार करण्यात येणाऱ्या विविध पदार्थांची माहिती पुस्तिकाही प्रकाशित करण्यात येणार आहे.”
महोत्सवात सहभागी झालेल्या विक्रेत्या महिलांनी महत्त्वपूर्ण मागणी मांडली. “दरवर्षी दोन दिवसांचा महोत्सव होतो, पण आम्ही जंगलात चार महिने भाज्या गोळा करतो. अशा उपक्रमांना सातत्य मिळालं पाहिजे, जेणेकरून आमचा रोजगारही नियमित होईल आणि शहरातल्या लोकांनाही रानभाज्या वर्षभर मिळतील,” असे एका रानभाजी विक्रेत्या महिलेने सांगितले.
आरोग्य, रोजगार आणि जागृती रानभाजी महोत्सवात दुर्मिळ आणि पारंपरिक २५ हून अधिक रानभाज्यांचे दर्शन शहरी नागरिकांना घडवण्यात आले. या निमित्ताने शहरी व ग्रामीण भागातले अंतर मिटवत रानभाज्यांची औषधी मूल्ये आणि उपयोग यांची ओळख निर्माण झाली. ग्रामीण महिलांसाठी हा उपक्रम रोजगारनिर्मितीचा एक महत्त्वाचा पर्याय ठरला.