कर्जत/संतोष पेरणे : आषाणे येथे असलेल्या धबधबा येथे आलेल्या तरुणांच्या ग्रुप मधील एक तरुण डोंगरावरून खाली कोसळला होता.दैव बलवत्तर म्हणून हा तरुण झाडीमध्ये कोसळला,मात्र त्या ठिकाणी असलेल्या आदिवासी तरुणांनी ही घटना पाहिल्याने त्या तरुणाला दरी मधून बाहेर काढण्यात यश आले.दरम्यान या जखमी तरुणावर सध्या रायगड हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत.
मंगळवार 5ऑगस्ट रोजी आषाणे धबधबा येथे मुंबई येथील एक पाच जणांचा ग्रुप पर्यटक आला होता.हे सर्व तरुण मुंबई येथून लोकल प्रवास करून भिवपुरी रोड स्टेशन वर पोहचले. त्यानंतर स्टेशन वरून चालत हे सर्व तरुण आषाणे धबधबा येथे पोहचले.सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास ही सर्व तरुण डोंगरावरून खाली येत असताना त्यातील सुशांत ताडे हा 20 वर्षीय तरुण डोंगरावरून खाली कोसळला.मात्र त्याचवेळी आषाणेवाडी येथील तरुण घरी परतत होते.त्या तरुणांनी वर्षासहली साठी आलेला तरुण डोंगरावरून दरीत कोसळला असल्याचे पाहिले.
कामावरून घरी परतत असलेले तरुण हे दरीत पडलेल्या तरुणाला बाहेर काढण्यासाठी धावत पोहचले. आषाणे वाडीमधील आदिवासी समाजाच्या तरुणांनी पोलीस पाटील यांना याबाबत माहिती दिल्यानंतर स्थानिक तरुण श्रीराम झुगरे,हरेश पिरकर,किरण पिरकर,दीपक साबरी,दीपक निरगुडे,कृष्णा पारधी,नामदेव साबरी,जगदीश पिरकड यांच्या मदतीला सोपान ठाणगे,प्रशांत ठोंबरे,विश्वास ठाणगे,मनोज ठाणगे हे सर्व दरीत उतरले.
मात्र त्यावेळी पाऊस सुरू असल्याने दरीत उतरलेल्या स्थानिक तरुणांना पडलेल्या पर्यटकाला शोधणे अवघड जात होते.पोलिस पाटील यांनी या घटनेची माहिती कर्जत पोलिस यांना दिल्यानंतर कर्जत पोलिस ठाण्याचे कर्मचारी देखील घटनास्थळी पोहचले.तिकडे या अतिशय अवघड ठिकाणी गवत झुडपात सदरचा तरुण दिसून आला.एका बाजूला दरी आणि दुसऱ्या बाजूला झाडे झुडपे यात हा तरुण पडलेला दिसून आला.मात्र 15 स्थानिक तरुण यांनी मदतकार्य केल्याने सतीश ताडे या तरुणाला जखमी अवस्थेत बाहेर काढले.तर अंधार पडू लागल्याने स्थानिक गावातील शरद ठाणगे, कबीर ठोंबरे, रणजित ठाणगे, यशवंत पिंगळे हे देखील घटनास्थळी थांबून होते.जखमी तरुणाला बाहेर काढल्यानंतर पोलिस उप निरीक्षक जयवंत वारा तसेच जयवंत काठे,चंद्रकांत रावते,महादेव कोरे यांनी जखमी तरुण यास रुग्णवाहिका मध्ये भरुन रायगड हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यास नेले.सध्या या तरुणाची प्रकृती स्थिर असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.कर्जत पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक संजय भोसले यांनी स्थानिक तरुणांचे कौतुक केले आहेत.