फोटो सौजन्य- प्रतिनिधी
भाईंदर/ विजय काते : जातीच्या नावावर वाटण्या करणाऱ्या काँग्रेसने 1947 पासून देशासोबत विश्वासघात केला. काँग्रेसचे अस्तित्व आता संपवण्याची वेळ आली आहे, असा हल्लाबोल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री व भाजप नेते योगी आदित्यनाथ यांनी आजच्या सभेत केला.मीरा भाईंदर येथे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ बुधवारी सायंकाळी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर मीरा भाईंदर मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार नरेंद्र मेहता आणि ओवळा माजीवडा मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार प्रताप सरनाईक तसेच घटक पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
‘बटेंगे तो कटेंगे’
‘बटेंगे तो कटेंगे’ असा नारा देत योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांचा समाचार घेतला. योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले, महाराष्ट्र ही संत, महापुरुषांची पुण्यभूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वांना एकत्रित करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. भारतासाठी ते सदैव प्रेरणादायी आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य बाळगंगाधर टिळक, बाजीराव पेशवे यांनी आदर्श घडवला. त्यांच्या प्रेरणेतून देश व समाजासाठी कार्य केले जात आहे.
माझ्यासाठी देश व सनातन धर्माशिवाय दुसरे काही नाही
ते पुढे म्हणाले की, १९४७ पासून निरंतर सत्ता चालवण्याची संधी काँग्रेसला मिळाली होती. मात्र, काँग्रेसने देशासोबत धोका केला. अखंड भारताचे तुकडे केले. आता काँग्रेस अध्यक्ष खरगे माझ्यावर राग व्यक्त करीत आहेत. माझ्यापेक्षा हैदराबादच्या निजामावर त्यांनी राग काढावा. माझ्यासाठी देश व सनातन धर्माशिवाय दुसरे काही नाही.निजामाच्या अत्याचारावर पडदा टाकण्याचे काम काँग्रेस करीत आहे, असा आरोप योगी आदित्यनाथ यांनी केला. जिथे विभागणी होते, त्याच ठिकाणी हिंदू उत्सवादरम्यान दगडफेक होते. त्यामुळे मतांचे विभाजन होऊ देऊ नका.
आपली लढाई महाविकास नव्हे तर महाअडाणी आघाडी विरोधात
आपली लढाई महाविकास नव्हे तर महाअडाणी आघाडी विरोधात आहे. ते लव जिहाद, लँड जिहाद सारख्या प्रकाराला प्रोत्साहन देतात. त्यामुळे चुकूनही त्यांचा विचार करू नका. अन्यथा आपले सण गणेशोत्सव, रामनवमीच्या मिरवणुकीवर दगडफेक होईल. निवडणुकीत कुठल्याही परिस्थितीत विभागले जाऊ नका, असे आवाहन योगी आदित्यनाथ यांनी केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आता नवीन भारताच्या सीमा सुरक्षित आहे. ५०० वर्षांत जे कार्य झाले नाही, ते नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात अयोध्यामध्ये भव्य राम मंदिर उभारून झाले. हा डबल इंजिन सरकारचा लाभ आहे. सर्व समस्यांचे समाधान केवळ डबल इंजिन सरकार असू शकते, असे देखील ते म्हणाले.
या मतदारसंघामध्ये महायुतीच्या उमेदवारांसमोर शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटांच्या उमेदवारांचे आव्हान आहे.