
कलाग्राम उद्घाटनाला वर्ष उलटूनही एकही कार्यक्रम नाही; तब्बल वर्षाभरानंतर होणार पहिला सांस्कृतिक कार्यक्रम
पुणे/ प्रगती करंबेळकर : सिंहगड रोडवरील पु.ल. देशपांडे कलाग्राम हे पुणे महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी सांस्कृतिक प्रकल्पांपैकी एक असून लोककला, ग्रामीण कलासंस्कृती आणि नवोदित कलाकारांना एकत्र आणणारे हे केंद्र ठरावे, या उद्देशाने तब्बल ६ कोटी रुपये खर्चून उभारण्यात आले. मात्र उद्घाटन होऊन वर्ष उलटूनही या कलाग्राममध्ये एकही कार्यक्रम झाला नव्हता. १३ ऑक्टोबर २०२४ रोजी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि आमदार माधुरी मिसाळ यांच्या हस्ते या कलाग्रामचे उद्घाटन मोठ्या उत्साहात झाले होते. त्यावेळी हे ठिकाण लोककला आणि सांस्कृतिक उपक्रमांचे नवे केंद्र बनेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती.
‘संवाद पुणे’चे अध्यक्ष सुनील महाजन यांनी दिलेल्या माहितीनुसार, कलाग्रामचा सांस्कृतिक विभागाशी अजून अधिकृत समावेश झालेला नाही. त्यामुळे तासाचे किंवा दिवसाचे भाडे किती असावे, वापरासाठी अटी काय असाव्यात, यासंदर्भातील कोणतेही नियम अद्याप ठरवलेले नाहीत.
तब्बल एक वर्षांनंतर पहिला कार्यक्रम होणार
पु.ल देशपांडे कलाग्राममध्ये तब्बल एक वर्षांनी ३० ऑक्टोबरला पहिला कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात देशभरातून आलेले कुशल कारागीर आणि कलाकार त्यांच्या पारंपरिक कलांसह आणि सर्जनशील कौशल्यांसह पुणेकरांना शिकवण्यासाठी येत आहेत. या विशेष वर्कशॉप मध्ये मध्य प्रदेशातील गोंड पेंटिंग, बिहारची मधुबनी पेंटिंग, राजस्थानचे ब्लॉक प्रिंटिंग, पश्चिम बंगालचे कलिघाट आर्ट, ओडिशाची पाम लीफ पेंटिंग, तसेच कर्नाटकचे वीविंग आर्ट अशा विविध प्रांतांच्या पारंपरिक कलांचा समावेश आहे. या पहिल्या कार्यक्रमानंतर कलाग्राम पुन्हा कलाक्षेत्रासाठी खुला होईल, अशी आशा व्यक्त होत आहे.