पावसाचा जोर मंदावला,;आता नुकसानीच्या पंचनाम्यांना वेग.
नीरा : गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेला मान्सूनपूर्व पाऊस काहीसा कमी झाला. पुरंदर तालुक्यातील अति पावसाच्या भागासह दुष्काळी भागाला पावसाने चांगलेच झोडपून काढले होते. जनजीवन ठप्प झाले होते. नंतर, सायंकाळपासून सासवड, जेजुरी, वाल्हे, परिंचे, नीरा या भागात उघडीप दिली आहे. या पूर्व मोसमी पावसाने शेतकऱ्यांच्या पीकांचे झालेल्या नुकसानीची पंचनामे आता महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेगात सुरू केले आहेत.
पुरंदर तालुक्यातील शेतकरी व गोपालक उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात चारा पिके करतात. परंतु अवकाळी पावसाची यंदा मोठी झळ या चारा उत्पादक शेतकऱ्यांना बसली आहे. आठवड्याभरात कोसळलेल्या धुवांधार पावसाने हाताशी आलेले चार पिक शेतकऱ्यांना गमवावे लागले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून, त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मका, व्हंडी, कडवळ, घास हे पिक नष्ट झाल्यामुळे त्यांच्या जनावरांच्या पुढील चार महिन्यांसाठी चाऱ्याची सोय नव्याने करावी लागणार आहे.
दरम्यान, खरीप हंगाम तोंडावर आलेला असताना आणि उन्हाळी शेतीतून बऱ्यापैकी उत्पन्न अपेक्षित असताना मागील आठवडाभर पावसाने चारा पिके आडवी झाली आहेत. मागील आठवड्यात झालेल्या पावसाच्या नोंदीमध्ये पुरंदर तालुक्यात २७६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, सर्वच धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.
सकाळी झाले सूर्यदर्शन
आठवड्याभरानंतर बुधवारी सकाळी सूर्यदर्शन झाले होते. संध्याकाळी थोडावेळ पावसाच्या सरी कोसळल्यानंतर तालुक्यात पावसाने उघडीप दिल्याचे चित्र आहे. गेल्या आठ दिवसात पुरंदर किल्ला परिसरातील या अतिपावसाच्या गावांसह दुष्काळी राख, नावळी, कर्नलवाडी, वाल्हे, वाघदरवाडी, पिंगोरी तसेच दक्षिण पूर्व भागातील गावांना चांगलेच झोडपून काढले. त्यामध्ये रस्ते, नाले, ओढे, नद्या तुडुंब भरून वाहू लागले होते. तसेच शेतात पाण्याचे तळे निर्माण झाले होते.
अनेक शेतीपिकांचे मोठे नुकसान
पुरंदर तालुक्यात अवकाळी पावसाने कांदा, टोमॅटो, काकडी, भुईमूग, ज्वारी, बाजरी तरकारी पिकांचे नुकसान झाले. भुईमुगाच्या शेंगांना मोड आले. तरकारी पिके भुईसपाट झाली. तसेच जोरदार वाऱ्यामुळे आंब्याची फळे मोठ्या प्रमाणावर पडली. पावसामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. याबाबत तालुका कृषी अधिकारी सुरज जाधव म्हणाले, ‘‘सर्व कृषी पर्यवेक्षक व तलाठी यांना त्यांच्या मंडलातील पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. शेतकऱ्यांनी त्यांच्याशी संपर्क करून झालेले नुकसान दाखवण्याचे सहकार्य करावे.’’