मुंबई – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादनासाठी मुंबईत येणा-या अनुयायांकरीता बृहन्मुंबई महानगरपालिकेने चैत्यभूमी, शिवाजी पार्क, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृह यासह आवश्यक त्या विविध ठिकाणी सुसज्ज नागरी सेवा-सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) आशीष शर्मा यांच्या मार्गदर्शनानुसार महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध स्तरिय कार्यवाही करण्यात येत आहे.
[read_also content=”मध्य रेल्वेकडून विक्रमी दंड वसुली, एप्रिल ते नोव्हेंबरमध्ये एकूण २१८ कोटींचा केला दंड वसुल https://www.navarashtra.com/maharashtra/record-fine-collection-from-central-railway-total-fine-collection-two-hundred-eighteen-crores-from-april-to-november-350412.html”]
यामध्ये प्रामुख्याने तात्पुरता निवारा, शामियाना, व्ही.आय.पी. कक्ष, नियंत्रण कक्ष, रुग्णवाहिका, आरोग्य सेवा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता, शौचालये, स्नानगृहे, बैठक व्यवस्थेसाठी बाकडे, विद्युत व्यवस्थेसह भ्रमणध्वनी चार्जिंग सुविधा इत्यादी सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर चैत्यभूमीतील आदरांजलीचे मोठ्या पडद्यावर थेट प्रक्षेपण करण्यात येणार असून समाजमाध्यमांद्वारे देखील थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे, अशी माहिती उप आयुक्त (परिमंडळ २) रमाकांत बिरादार यांनी दिली आहे.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज मैदान व चैत्यभूमी इत्यादी ठिकाणी करण्यात येणा-या सोयी-सुविधांचे नियोजन व अंमलबजावणी ही प्रामुख्याने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जी उत्तर विभागाद्वारे करण्यात येत आहे. याबाबत अधिक माहिती देताना जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत सपकाळे यांनी सांगितले की, महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी देशभरातून येणा-या अनुयायांना काही काळ विश्रांती घेता यावी, यासाठी छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे तात्पुरता निवारा, शामियाना उभारण्यात येत आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीत तात्पुरत्या निवा-याची सोय म्हणून सदर परिसरातील महानगरपालिकेच्या ६ शाळा निश्चित करण्यात आल्या आहेत. या शाळांमध्ये देखील आवश्यक त्या सर्व नागरी सेवा-सुविधा सुसज्ज ठेवण्यात आल्या आहेत.
महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागातर्फे दरवर्षी महापरिनिर्वाण दिनानिमित्त, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित सचित्र माहिती पुस्तिका प्रकाशित करण्यात येते. प्रतिवर्षी या माहिती पुस्तिकेच्या १ लाख प्रतींचे विनामूल्य वितरण चैत्यभूमी येथे करण्यात येते. यावर्षीच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन सोमवार, दिनांक ५ डिसेंबर, २०२२ रोजी सकाळी विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. महानगरपालिकेतर्फे चैत्यभूमी परिसर, छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसर, दादर रेल्वे स्थानक, राजगृह (हिंदू कॉलनी), डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय (वडाळा) व लोकमान्य टिळक टर्मिनस (कुर्ला) येथे आवश्यक त्या सर्व नागरी सेवा-सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने पुढील बाबींचा समावेश आहे.