ठाणे/ स्नेहा जाधव, काकडे : दिव्यात नालेसफाई झाली नसल्यामुळे यंदा पुन्हा एकदा नागरिकांचे हाल सुरू झाले आहेत. चाळीतल्या घरांमध्ये पाणी शिरलं, रस्ते तुंबले, तर बेडेकर नगर, गणेश नगर, बी.आर. नगर, मुंब्रा देवी कॉलनी, डीजे कॉम्प्लेक्स, दिवा आगासन मुख्य रस्ता अशा अनेक भागात पाणी साचल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
वारंवार तक्रारी करूनही ठाणे महापालिकेने डोळेझाक केली. दरवर्षी प्रमाणे कोट्यवधी रुपयांचा निधी नालेसफाईसाठी मंजूर होतो, कंत्राटदारांना मोबदला मिळतो, पण प्रत्यक्षात नाले मात्र साफ होत नाहीत. यावर्षी तर फक्त नावालाच पहिला फेरा झाला आणि त्यानंतर सफाई थांबली. महापालिकेचा संपूर्ण कारभार भ्रष्टाचाराने पोखरलेला असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. अशा तीव्र शब्दांत शिवसेना ठाकरे पक्षाचे रोहिदास मुंडे यांनी महापालिकेच्या या निष्काळजीपणावर जोरदार टीका केली आहे.
नागरिकांना होणाऱ्या या त्रासाला जबाबदार महानगर पालिका आहे, त्यामुळे स्वच्छता निरीक्षक, सहाय्यक आयुक्त आणि ठेकेदार यांच्यावर तात्काळ कारवाई व्हावी अशी मागणी रोहिदास मुंडे यांनी केली आहे. मुंडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत प्रत्यक्ष नालेसफाई करून महापालिकेची पोलखोल केली. नागरिकांसमोरच श्लोक नगर दातिवली नाला, रिलायन्स टॉवर येथील नाला, टाटा पॉवर लाईन रोड नाले दाखवत “महापालिकेचे दिंडवडे निघाले” अशी बोचरी टीका करत त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले.
दिव्यातील नागरिक त्रस्त आहेत, महापालिका मात्र निद्रिस्त आहे! भ्रष्टाचार आणि ढिलाईचा हा खेळ तातडीने थांबवून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई केली नाही, तर शिवसेना रस्त्यावर उतरून मोठा आंदोलन उभारेल, असा इशारा ॲडव्होकेट रोहिदास मुंडे यांनी दिला आहे. नालेसफाईच्या दौऱ्या वेळी कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख ॲडव्होकेट रोहिदास मुंडे, शहर प्रमुख सचिन पाटील, विभागप्रमुख योगेश निकम, उपविभाग प्रमुख संदीप राऊत, अशोक अमोडकर, अमोल म्हात्रे, सचिन केसरकर, आकाश विचारे, शैलेश कदम, विलास मुलम, रंजना देसाई, तेजस ओपले, पद्मा चव्हाण, अनिता कनेरे, शेखर पालशेट्टी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.