ठाणे/ स्नेहा जाधव काकडे : राज्यात कोकण विभाग तसंच मुंबई आणि उपनगर परिसरात पावसाने झोडपून काढले आहे. याचपार्श्वभूमीवर हवामान खात्याने आता ठाणे जिल्हाला देखील अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सर्व विभागांमध्ये सतर्क ठेवण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाकडून खाडीकिनारी राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहे.
जिल्ह्यातील खाडी आणि नदी / नाला इ. पाण्याकाठच्या रहिवाशांनी सतर्क राहावे. नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी तसेच अत्यावश्यक कामासाठीच घराबाहेर पडावे. नागरिकांनी घाबरून न जाता कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षा 022- 25301740 किंवा 9372338827 या क्रमांकावर अथवा 1077 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे.
आपत्ती अधिनियमाच्या तरतुदींच्या अनुषंगाने आज सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच शासकीय आणि निमशासकीय कार्यालयातील अत्यावश्यक कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त उर्वरीत कर्मचाऱ्यांना कार्यालय सोडणेबाबत कार्यालयप्रमुखांनी त्यांच्या स्तरावरून निर्णय घेण्याबाबत कार्यालयप्रमुखांना निर्देशित करण्यात आले आहे. दि.20 ऑगस्ट 2025 रोजी शाळा, महाविद्यालयांच्या सुट्टीबाबत पावसाच्या अंदाजानुसार आज संध्याकाळपर्यंत निर्णय घेण्यात येईल, असेही ठाणे जिल्हा प्रशासनाने कळविले.
मुंबई आणि उपनगराताला मुसळधार पावसाचा चांगला फटका बसला असून जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे. पुढील तीन ते चार तास अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं आहे. सोमवारी संपूर्ण 24 तासात ठाण्यात 225 एमएम पाऊसाची नोंद झाली आहे. तर आज सकाळी 6.30 वाजल्यापासून ते 11.30 पर्यंत म्हणजेच मागील पाच तासात 40 एमएम इतकी ठाण्यात पावसाची नोंद झाल्याचं ठाणेपालिका आयुक्त सौरभ राव यांनी सांगितलं आहे.