File Photo : Dengue
दहिवडी : माण तालुक्यात सध्याच्या दूषित हवामानामुळे मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढली असून डेंग्यू व मलेरियाच्या रुग्णात लक्षणीय वाढ झाली आहे.याबाबत प्रशासन मात्र अद्यापही गाफीलच असल्याने खाजगी दवाखान्यातील बेड गेल्या काही दिवसांपासून फुल्ल झाले आहेत. संबंधितांनी वेळीच उपाययोजना आखल्या नाहीत तर परिस्थिती आटोक्याबाहेर जाऊन आजाराचा भडका उडण्याची भीती व्यक्त होत आहे.
सध्या सर्वत्र मोठा पाऊस सुरू असताना माण मध्ये मात्र पावसाची रिमझिम सुरू आहे.त्यामुळे दूषित वातावरण होऊन सर्दी,ताप, थंडी,खोकला तसेच उलट्या,जुलाब,अंगदुखी या आजाराने मोठ्या प्रमाणात लोक हैराण झाले आहेत.वातावरणातील दूषित हवेमुळे हे रोग पसरत असून धोक्यात अधिकच वाढ होत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.विशेषतः रुग्णाला सुरुवातीला हलकासा ताप येऊन रक्तातील पेशी मोठ्या प्रमाणात कमी अधिक होण्याचे प्रकार वाढले आहेत.त्यामुळे रुग्णांना डेंग्यू,मलेरियाची लागण मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसत आहे.या परिस्थितीत रुग्णांना तातडीने उपचाराची आवश्यकता भासत आहे.परंतु आरोग्य विभाग मात्र अजूनही गाफील असल्याचेच दिसत असल्यामुळे लोकांना खाजगी दवाखाण्याचाच आधार घ्यावा लागत आहे.रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे खाजगी दवाखान्यातील बेड सध्या हाऊसफुल्ल असल्याचे पाहायला मिळत आहे.आधीच महागाईने पिचलेल्या सर्वसामान्यांना खाजगी रुग्णालयात उपचार घेताना आजाराबरोबरच मोठा आर्थिक त्रासही सहन करावा लागत आहे.
आरोग्य विभागाने गावोगावी सर्वेक्षण करून वेळीच उपाययोजना आखण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.वाढत्या रुग्णासंख्येच्या गावात स्थानिक ग्रामपंचायतीकडून स्वच्छता व पाणी व्यवस्थापनाबाबत काळजी घेण्याची गरज आहे.तसेच डास निर्मूलनासाठी धूर फवारणी करून साथीचे रोग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे बनले आहे.
[blockquote content=” दूषित वातावरणामुळे उद्भवणाऱ्या साथरोगाचा प्रसार रोखण्यासाठी सर्वांनीच काळजी घेण्याची आवश्यकता आहे.आरोग्य विभागाकडून उद्या(बुधवार)पासून गावोगावी सर्वेक्षण करून उपाययोजनांसह जनजागृती करण्यात येणार आहे. ” pic=”” name=”-डॉ लक्ष्मण कोडलकर, तालुका वैद्यकीय अधिकारी,माण”]






