राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असताना, वाशिम जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांबाबत पुन्हा एकदा अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाने नगर पालिका, नगरपंचायती, महानगरपालिका तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका ३१ जानेवारीपूर्वी घेण्याचे आदेश दिले होते. मात्र, काही ठिकाणी आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्षेप उपस्थित झाल्याने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांना मुदतवाढ देण्यात आली असून, या निवडणुका फेब्रुवारी अखेरपर्यंत घेण्यास परवानगी देण्यात आली आहे.
TMC मध्ये १६,४९,८६९ इतकी मतदारसंख्या, आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी ठाणे महापालिका सज्ज
या निर्णयाचा थेट परिणाम इच्छुक उमेदवारांवर झाला असून, अनेकांची तयारी वाया गेल्याची भावना व्यक्त होत आहे. वाशिम जिल्ह्यातील ५२ जिल्हा परिषद गट व १०४ पंचायत समिती गणांसाठी निवडणूक प्रक्रिया नगर पालिका व महानगरपालिका निवडणुका पार पडल्यानंतर सुरू होण्याची शक्यता होती. मात्र, आरक्षणासंदर्भातील कायदेशीर अडचणींमुळे या निवडणुकांवर सध्या प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी मुदतवाढ दिल्यानंतर, ही प्रक्रिया आता १५ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करणे आवश्यक ठरणार आहे. त्यामुळे निवडणुकीची तारीख, आरक्षण निश्चिती आणि उमेदवारी अर्ज याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने राजकीय वातावरण तापले आहे. अनेक इच्छुकांनी गावोगावी संपर्क वाढवला होता, बैठका, मेळावे, प्रचाराची तयारी सुरू केली होती. मात्र, निवडणूक लांबल्याने त्यांच्या उत्साहावर पाणी फिरले आहे.
दरम्यान, खामगाव येथून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात महापालिका निवडणुकांच्या अंतिम टप्प्यात असतानाच ग्रामीण राजकारणालाही वेग आला आहे. तब्बल चार वर्षांच्या खंडानंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा बिगुल वाजला असला, तरी प्रत्यक्षात काही जिल्ह्यांमध्ये निवडणुका पुन्हा लांबणीवर पडल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी (दि. १३) पहिल्या टप्प्यातील निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता.
या कार्यक्रमानुसार राज्यातील १२ जिल्हा परिषद व १२५ पंचायत समित्यांसाठी पाच फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, सात फेब्रुवारी रोजी मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात येणार आहेत. मात्र, बुलढाणा जिल्ह्यातील ६१ जिल्हा परिषद गट व १३ पंचायत समिती गणांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर पडल्या आहेत. याचा परिणाम शेजारच्या वाशिम जिल्ह्यातील राजकीय हालचालींवरही होताना दिसत आहे.
PMC Election मध्ये पीएमपी व्यस्त? प्रवाशांना मोठा फटका; १,७५० पैकी ‘इतक्या’ बस आरक्षित
एकूणच, ‘मिनी मंत्रालय’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांबाबत वाशिम जिल्हावासीयांमध्ये उत्सुकता कायम असली, तरी वारंवार होणाऱ्या बदलांमुळे इच्छुक उमेदवारांचा हिरमोड होत आहे. निवडणूक प्रक्रिया नेमकी कधी सुरू होणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.



