मुंबई : गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोचे दर (Tomato Price) चांगलेच वाढत असल्याचे दिसत आहे. पावसामुळे भाज्यांचे दर महागले (Rates of Vegitables) असून, आता गृहिणींचे बजेट हाताबाहेर जात आहे. वाढत्या महागाईमुळे (Inflation) कंबरडे आधीच मोडले असताना आता भाज्यांचे दर तर गगनाला भिडले आहेत. त्यात घाऊक बाजारात टोमॅटोची आवक कमी होत असल्याने दराने उच्चांक गाठला आहे. सोमवारी टोमॅटोचे दर घाऊकमध्ये 100-110 रुपये प्रतिकिलो तर किरकोळ बाजारात हाच दर 160 रुपयांपर्यंत गेल्याचे दिसत आहे.
टोमॅटोसह इतर अनेक भाज्यांचे दर वाढताना दिसत आहेत. त्यात स्वयंपाक घरातील गुणकारी म्हणून ओळखले जाणाऱ्या अदरकसाठी दर किलोमागे वाढले आहेत. महागाईमुळे त्यांची विक्री निम्म्याने कमी झाल्याचे दुकानदार सांगतात. त्यात यापूर्वी जे एक किलो टोमॅटो घ्यायचे ते आता पाव किलोवर आले आहे. म्हणजेच महागाई किती वाढली, यातून एक अंदाज बांधता येऊ शकतो. शिवाय, घाऊक बाजारातून महागडा भाजीपाला मिळत असताना किरकोळ बाजारातही महागड्या दराने विकत आहोत.
टोमॅटोचे दर असे कधी वाढताना न पाहिल्याने सर्वसामान्यांना एकप्रकारे धक्काच बसत आहे. कारण आधीच महागाईने त्रस्त झालेल्या लोकांना या दरवाढीचा मोठा फटका सहन करावा लागत आहे.
मागणी अधिक पण पुरवठा घटला
महाराष्ट्रातून टोमॅटोचा पुरवठा देशभरात केला जातो. बाजारात टोमॅटोचा तुटवडा आहे. टोमॅटोची आवक घटल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे मालही कमी येत आहे. मागणी जास्त असून, आवक कमी आहे. त्यामुळे हे दर वाढताना दिसत असल्याचे सांगण्यात येत आहे.