सोलापूर : मार्केटयार्ड ते शेळगी ब्रिज या रस्त्यावर एका ट्रकने रिक्षाला उडवल्याने झालेल्या भीषण अपघातात महिला, पुरुष लहान मुलांसह १० जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात रिक्षाचा अक्षरक्ष: चुराडा झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. जखमींवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार चालू असून प्रहार संघटनेचे कार्यकर्ते उपचारासाठी मदत करताना दिसत आहेत.
अपघात शुक्रवारी दुपारच्या सुमारास झालाएम एच १३ २२०९ असा रिक्षाचा नंबर आहे. एम एच ४३ बीपी ८७८ असा ट्रक क्रमांक दिसत आहे. ट्रकने जोरदार धडक दिल्यानंतर रिक्षातील चार महिला, दोन पुरुष, चार लहान मुले हे गंभीर जखमी झाले आहेत. या सर्वांना मदतीसाठी वेळेवर ॲम्बुलन्स न आल्याने जखमींना मिळेल त्या वाहनाने सिव्हील हॉस्पिटलमध्ये आणण्यात येत आहे. काहीजण दुचाकीवर काहीजण रिक्षामध्ये जखमींना सिव्हीलमध्ये आणत असल्याचे चित्र पाहायला मिळालं. प्रहार संघटनेचे कार्यकर्ते जमीर शेख हे स्वतः या ठिकाणी जखमींवर उपचार होण्यासाठी सिव्हीलमध्ये ठाण मांडून असल्याचं दिसून येत आहे. हे सर्व अति गंभीर जखमी असून त्यांच्यावर तातडीने सिव्हिल हॉस्पिटलच्या ओपीडी मध्ये तात्काळ उपचार सुरू करण्यात आले आहेत कोणत्याही जखमीची अद्याप ओळख पटलेली नाही.