This year, the price of seeds has gone up by Rs 500 to Rs 100 for soybean bags and Rs 43 for cotton.
सिंदी : शेतकरी विविध संकटातून जात आहेत. कधी नापिकी, कधी कमी उत्पादन, घसरणारे भाव आदी कारणांमुळे शेतकऱ्यांना नुकसानच जास्त सहन करावे लागते. प्रत्यक्षात उत्पादनाची काय स्थिती आहे, याचा विचार न करता शेतकऱ्यांचे उत्पादन वाढल्याचा शाब्दिक बाजार केला जात असताना आता बियाण्यांच्या दरात भरमसाठ वाढ झाली आहे. विविध कंपन्यांकडून दर जाहीर करण्यात आले असून, सोयाबीनच्या बियाण्यांमध्ये थैलीमागे ५०० ते १००० रुपयांची दरवाढ करण्यात आली आहे. तुरीच्या बियाण्यांचे दर स्थिर असले तरी कपाशीच्या बियाणांच्या दरातही प्रतिपाकिटमागे ४३ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
कापूस, तूर, सोयाबीन ही खरीप हंगामातील महत्वाची पिके आहेत. कापूस, सोयाबीनचा पेरा सर्वाधिक असतो. यंदा कपाशीचे दर १४ हजाराच्या जवळपास राहिल्याने लागवडीत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यासोबतच सोयाबीन लागवडीचेही क्षेत्र मोठे राहण्याचा अंदाज आहे. खरीप हंगाम तोंडावर आल्याने शेतकऱ्यांचे लक्ष आता बियाणांच्या दराकडे लागलेले आहे. उत्पादकता घटल्यास त्याचा दोष व्यवस्थापन, निसर्गाच्या माथी मारून कंपन्या हातवर करीत असल्याचा अनुभव असला तरीही शेतकऱ्यांना प्रत्येक हंगामात बियाणे घेण्यासाठी दुकानांमध्ये जावेच लागते. शेतमालाचे भाव पडल्यानंतरही दरवाढ मात्र, कमी होत नाही. यावर्षी सोयाबीनच्या बियाणांच्या किमतीत चांगलीच वाढ झाली आहे. बाजारात वेगवेगळ्या कंपनीचे बियाणे उपलब्ध असून, दरातही बॅगमागे ५०० ते १००० रुपयांपर्यंतची वाढ झाली आहे.
बियाणांच्या दरवाढीमुळे शेतीच्या खर्चातही मोठी वाढ होणार आहे. बाजारात सर्टीफाईट आणि तृथफुल अशा दोन प्रकारचे बियाणे उपलब्ध होते. त्यात कंपन्यांनी संशोधित केलेले वाण तसेच विद्यापीठाने संशोधित केलेल्या वाणाचा समावेश असतो. मागील वर्षी सोयाबीन बियाणांचे दर ३ हजार ६०० रुपये ते ४ हजार रुपये होते. यंदा त्यात चांगलीच वाढ झाली आहे. काहींचे दर तर ४ हजार रुपये ते ५ हजार रुपयांपर्यंत पोहचल्याची माहिती आहे. रिसर्च नावाने ओळखल्या जाणाऱ्या बियाणांच्या एका पिशवीत २७ तर, दुसऱ्या प्रकारच्या एका पिशवीत ३० किलोपर्यंत बियाणे उपलब्ध असते. कापूस बियाणांच्या दरातही वाढ झाली आहे. कापसाच्या बियाणांच्या प्रति पाकिटवर ८१० रुपये एमआरपी आहे. मागील वर्षी ही एमआरपी ७६७ रुपये होती. यावर्षी त्यामध्ये ४३ रुपयांची वाढ झाली आहे. एका पाकिटमध्ये ४७५ ग्रॅम बियाणे असते. त्यात ४५० ग्रॅम बीटी २ तर २५ ग्रॅम नॉनबीटी बियाणे असते. बियाणांचे वाढलेले दर उत्पादन खर्चात मात्र, वाढ करणारे आहेत हे मात्र खरे !
बोगस बीटी बियाणांची परराज्यातून घुसखोरी
बोगस बीटी बियाणे विक्री करण्यासाठी विक्रेत्यांनी काही नव्या युक्त्या लढविल्या आहेत. त्यामध्ये बोगस बीटी करिता मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, गुजरात मधून घुसखोरी होत असल्याचा संशय कृषी विभागाला आहे. त्यामुळे, जिल्ह्याच्या सीमेवर विशेष लक्ष ठेवण्यात आले आहे. भरारी पथकाला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.