घोडेगाव : घोडेगाव येथील सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते नंदकुमार लक्ष्मण बोराडे यांच्यावर १० मार्च रोजी झालेल्या खुनी हल्ला प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले. बार व्यवसाय बंद व्हावा तसेच इमारतींच्या नोंदी होऊ नयेत म्हणून नंदकुमार बोराडे (वय ४६, रा. घोडेगांव) यांनी ठिकठिकाणी अर्ज केले होते. याचा राग मनात धरून जितेंद्र प्रभाकर काळे (वय ४०, रा.घोडेगाव) याने सुपारी देऊन हा हल्ला योगेश पवार (रा.विक्रोळी वय-४०), जाफर शमीम अहमद (रा.मुंब्रा वय २४), शबाझ मेनन (रा. मुंबई वय २८) यांच्यामार्फत घडवून आणला.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काळेवाडी दरेकरवाडी गावाच्या हद्दीत रात्री सव्वा अकराच्या सुमारास आंबेगाव पंचायत समिती कार्यालयाच्या संरक्षित भिंती लगत नंदकुमार बोऱ्हाडे उभे असताना दुचाकीवर आलेल्या दोन अनोळखी इसमांनी धारदार हत्याराने वार करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. या हल्ल्यात नंदकुमार बोराडे यांच्या डाव्या हाताची करंगळी तुटली. दोन अनोळखी इसमांनी हल्ला केल्याचा गुन्हा घोडेगाव पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. चार आरोपी पकडण्यात यश आले असून, एक आरोपी अद्याप फरार असून लवकरच जेरबंद केले जाईल, अशी माहिती घोडेगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन माने यांनी दिली आहे.
संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती. तेव्हापासून घोडेगाव पोलीस ठाण्याचे जीवन माने व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा या तपासाच्या मागावर होते. या तपासात कोणतेही सबळ पुरावे मिळत नव्हते, सीसीटीव्ही फुटेज व्यवस्थित समजत नव्हते, अंधार असल्याने नंदकुमार बोराडे यांनादेखील हल्ला केलेल्या हल्लेखोरांचे चेहरे नीट दिसले नाहीत. संशयित अनेक असल्याने नेमके हे कृत्य कोणी केले याचा अंदाज पोलिसांना येत नव्हता. अनेक संशयितांवर पोलिसांनी पाळत ठेवून लक्ष ठेवले. अनेक संशयितांना बोलवून उलट तपासणी केली, तासन् तास बसून मिळालेले सीसीटीव्ही फुटेज पाहिले.
या गुन्ह्याचा तपास पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक मितेष घट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अशोख शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने, पोलीस उपनिरीक्षक सतीश डौले, किशोर वागज, अनिल चव्हाण, पोलीस अंमलदार दत्तात्रय जढर, अविनाश कालेकर, संदीप लांडे, जालिंदर रहाणे, संदिर रसाळ, नामदेव ढेंगळे, मनिशा तुरे, संगिता मधे, तसेच स्थानिक अन्वेषण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे, पोलीस अंमलदार दीपक साबळे, विक्रम तापकीर, राजू मोमीन, अतुल डेरे, संदीप वारे, अक्षय नवले, नीलेश सुपेकर यांनी तपास केला.






