पिंपरी : चिंचवड येथे नव्याने उभारण्यात आलेल्या क्रांतीवीर चापेकर बंधू राष्ट्रीय संग्रहालयाच्या लोकार्पण कार्यक्रमासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर तयारी करण्यात आली आहे. आज (18 शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य मंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमाच्या सुरक्षेसाठी पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
या समारंभासाठी एकूण ३०० पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. उच्च पदस्थ पोलीस अधिकारी यावर लक्ष ठेवून असणार आहेत. स्थानिक पोलिसांसह दंगा नियंत्रण पथक (QRT), बॉम्ब शोध पथक, श्वान पथक, सायबर सुरक्षा युनिट आणि गुप्तचर विभागाचाही यामध्ये समावेश आहे. कार्यक्रम स्थळाभोवती झोनिंग करून प्रत्येक सेक्टरवर स्वतंत्र अधिकारी आणि पोलिस तैनात असणार आहेत.
मुख्यमंत्री आणि इतर नेत्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून, कार्यक्रम स्थळाभोवतीच्या १७ उंच इमारतींच्या टेरेस आणि बाल्कन्या पोलिसांनी हायजॅक केल्या आहेत. या इमारतीवरून विशेष नजर असणार आहे. सुरक्षा दृष्टीने या इमारती ‘हायजॅक’ केल्या असून, टेरेसवर सशस्त्र जवान, वायरलेस कम्युनिकेशन यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. कोणतीही संशयास्पद हालचाल वरून त्वरित टिपता यावी, यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे.
कार्यक्रमस्थळी आणि परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे उभारण्यात आले असून, सर्व फुटेज थेट कंट्रोल रूममध्ये पोहोचणार असल्याचे सांगण्यात येत आहे. नियंत्रण कक्षातून संपूर्ण हालचालींवर बारकाईने नजर ठेवली जाणार आहे.
कार्यक्रमासाठी येणाऱ्या वाहनांची स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. VIP व सामान्य पाहुण्यांसाठी वेगवेगळे मार्ग निश्चित केले असून, वाहतूक शाखेकडून याबाबतचे नियोजन करण्यात आले आहे.
Todays Gold-Silver Price: 24 कॅरेट सोन्याचा भाव 97 हजारांवर, चांदीच्या दरानेही गाठला उच्चांक
कार्यक्रम स्थळाच्या आजूबाजूला ड्रोन वापरास बंदी घालण्यात आली आहे. परिसरात संशयास्पद हालचाल किंवा व्यक्ती आढळल्यास पोलिसांना तात्काळ माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संपूर्ण सुरक्षाव्यवस्था सकाळी ६ वाजल्यापासून सक्रिय होणार असून, मान्यवर परिसरातून निघून जात नाहीत तोपर्यंत ती कायम राहणार आहे.