
निम्म्यापेक्षाही कमी महिलांची ई-केवायसी पूर्ण; 2.40 कोटींपैकी 80 लाख बहिणींनी केली पूर्ण
मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. या योजनेत पारदर्शकता येण्यासाठी आणि लाभार्थी महिलांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळावा, यासाठी ई-केवायसी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, आत्तापर्यंत 2.40 कोटी महिलांपैकी केवळ 80 लाख महिलांनीच ई-केवायसी पूर्ण केल्याचे समोर आले आहे.
सध्या 2 कोटी 40 लाख महिला लाडकी बहीण योजनेंतर्गत लाभ घेत आहेत. 18 सप्टेंबरपासून या महिलांचे ई-केवायसी करण्यास सुरुवात झाली अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. मात्र, कधी ओटीपी येण्यात अडचण तर कधी आधार संलग्नतेतील अडचणींमुळे महिलांना ईकेवायसीत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यातील काही तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी सर्व्हरची क्षमता वाढवून प्रतिदिन 5 लाख ऐवजी प्रतिदिन 10 लाख करण्यात आली आहे.
हेदेखील वाचा : लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी महत्त्वाचे ! 18 नोव्हेंबरपर्यंत e-KYC करा पूर्ण; अन्यथा…
दरम्यान, लाडकी बहीणच्या लाभार्थ्यांपैकी 26 लाख लाभार्थ्यांचे पैसे थांबवण्यात आले होते. या लाभार्थ्यांची ओळख निश्चित झाल्यानंतर 20 लाख लाभार्थ्यांचे पैसे सुरू करण्यात आले. मात्र, अद्यापही सहा लाख लाभार्थ्यांची ओळख पटलेली नाही. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेंतर्गत अपात्र असणाऱ्या लाभार्थ्यांनी आतापर्यंत सरकारकडून १६४.५२ कोटी रुपयांचा लाभ उकळल्याचे समोर आले आहे. सध्याच्या घडीला 2.41 कोटी महिला या योजनेचा लाभ घेत असून, आतापर्यंत महिला व बालकल्याण विभागाने 26.34 लाख संशयित खाती वगळली आहेत.
12 जणांकडून सरकारकडून वसूली होणार
विविध विभागांत सात हजार सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांनी लाडकी बहीणचा लाभ घेतल्याचे आढळले आहे. या महिला कर्मचाऱ्यांची यादी महिला व बालविकास विभागाकडून संबंधित विभागांकडे पाठविण्यात आली आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असून पैसेही वसूल करण्यात येणार आहेत. 12 हजार पुरुष लाभार्थी यात सापडले असून, त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे.
18 नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी पूर्ण होणे अपेक्षित
दूर झालेल्या तांत्रिक अडचणी व सर्व्हरची वाढलेली क्षमता पाहता 18 नोव्हेंबरपर्यंत सर्व लाभार्थ्यांचे ई-केवायसी पूर्ण होणे अपेक्षित असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, काही प्रमाणात लाभार्थ्यांची ई-केवायसी राहिल्यास तत्कालीन परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती अदिती तटकरे यांनी दिली. विधवा तसेच घटस्फोटीत महिलांना ई-केवायसी करण्यात मोठी अडचण येत आहे. पती तसेच वडीलही हयात नसल्याने त्यांना ई-केवायसी करण्यात येत नसल्याच्या तक्रारी विभागाकडे येत आहेत.