
Suicide News
येवला : नापिकी व कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्यांचे (Farmers Suicide) लोण आता मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या येवला तालुक्यात पोहोचले आहे. सततची नापिकी, मातीमोल भावात विक्री होत असलेला कांदा आणि त्यातून कर्जाचा वाढता डोंगर यामुळे शेतकऱ्याने आत्महत्या केली. येवला तालुक्यातील वडगाव येथील अल्पभूधारक शेतकरी भाऊसाहेब दामू वाल्हेकर (58) या शेतकऱ्याने आपली जीवनयात्रा संपवली.
वाल्हेकर यांनी हात उसनवारीचे काही कर्ज घेतले होते. पण ते परतफेडीची चिंता त्यांना होती. त्यात सततची नापिकी आणि शेतात पिकवून ठेवलेल्या कांद्याला कवडीमोल भाव असल्याने जवळच असलेल्या एका शेततळ्यात त्यांनी कांदा साठवून ठेवला होता. मात्र, भाव वाढण्याची कोणतीही चिन्हे न दिसल्याने अखेर बुधवारी (दि. 24) रात्रीच्या सुमारास आत्महत्या केली. कांद्याला योग्य भाव नसल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
येवल्याचे तहसीलदार कुटुंबियांच्या भेटीला
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर येवल्याचे तहसीलदार आबासाहेब महाजन यांनी तातडीने शेतकऱ्याच्या घरी धाव घेत कुटुंबियांचे सांत्वन केले. शासनस्तरावर योग्य ती मदत केली जाईल, असे आश्वासन दिले.