
पंचवटीच्या रणसंग्रामात बाजी कोण मारणार? घराणेशाही, बाहुबली उमेदवार, बंडखोरी आणि अपक्षांचा करिश्मा
मंत्री गिरीश महाजन यांच्या वैयक्तिक सहाय्यकाच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आल्याने, “खरा पॉवर सेंटर कुठे आहे?” यावरून राजकीय चर्चाना उधाण आले आहे. मंत्री थेट मैदानात नसले, तरी त्यांच्या निकटवर्तीयांशी संबंधित उमेदवारीमुळे रूपाली नन्नावरे यांना निवडून आणत एससी आरक्षणद्वारे महापौरपद बहाल करेपर्यंत हा प्रभाग भाजपासाठी प्रतिष्ठेचा बनला आहे.
दुसऱ्या प्रभागात सुनील बागूल यांचे चिरंजीव बागूल बागूल रिंगणात उतरल्याने घराणेशाहीविरुद्ध नव्या चेहऱ्यांची लढत रंगली आहे. खुनाच्या गुन्ह्यात संशयित म्हणून कारागृहात असलेल्या उद्धव निमसे यांचे चिरंजीव रिद्धेश निमसे रिंगणात असल्याने हा प्रभाग चर्चेत आहे. विशेष म्हणजे, ठाकरे गटातील भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हाप्रमुख वैभव ठाकरे यांचे रिद्धेश निमसे यांना आव्हान उभे ठाकले आहे.
एकूणच पंचवटीत घराणेशाहीचा प्रभाव चालणार की बाहूबली प्रतिमेचा दबदबा, की मग अपक्षांचा अनपेक्षित करिष्मा हा खरा प्रश्न मतदारांसमोर आहे. ही निवडणूक केवळ नगरसेवक निवडण्याची नसून, अनेक नेत्यांच्या राजकीय वजनाची कसोटी ठरणार आहे. १६ तारखेला मतदार राजा कोणाला सतेची चावी देणार, हे स्पष्ट होईल.
मखमलाबाद गावातील प्रसिद्ध पैलवान वाळू काकड यांनी निवडणूक आखाड्यात उडी घेतल्याने प्रचारालाही कुस्तीच्चा रंग चढला आहे. मैदानातील ताकद मतपेटीत किती रुपांतरित होते, याची उत्सुकता तरुण मतदारांमध्ये दिसून येत आहे. यातच भर म्हणून इगतपुरी-त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर यांच्या कन्या इंदूमती खोसकर पंचवटीतील एका प्रभागातून निवडणूक लढवीत आहेत. आमदारांनी स्वतःचा मतदारसंघ बाजूला ठेवून मुलीच्या विजयासाठी प्रतिष्ठा पणाला लावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोरात सुरू आहे. ही निवडणूक केवळ नगरसेवकाची नसून आमदारांच्या राजकीय ताकदीची चाचणी मानली जात आहे.
भाजपाकडून माजी नगरसेवक दामोदर मानकर यांना तिकीट नाकारल्याने त्यांनी स्वतंत्र पॅनल उभारत बंडखोरीची भूमिका घेतली आहे. याचा थेट फटका भाजपालाच बसणार की खुद्द दामोदर मानकर यांना, याकडे सर्वांचे लक्ष आहे. तसेच माजी महापौर अशोक मुर्तडक यांनाही ऐनवेळी भाजपाने तिकीट नाकारल्याने त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला, मात्र शिवसेनेच्या तीन उमेदवारांसोबत समन्वय साधत अपक्ष पण शिवसेना पुरस्कृत अशी रणनीती त्यांनी आखली आहे. यामुळे मत्फुटीचा धोका वाढला असून भाजपासाठी ही मोठी डोकेदुखी ठरत आहे.