फोटो सौजन्य: Social Media
मुंबई : टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांचे बुधवारी रात्री निधन झाले. त्यांच्या निधनाने भारताच्या उद्योगजगतात मोठी शोककळा पसरली आहे. रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यामुळे त्यांना मुंबईतील रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांचे उपचारादरम्यानच निधन झाले. उद्योगपती रतन टाटा यांच्या सन्मानार्थ राज्यात आज दिवस दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.
हेदेखील वाचा : Ratan Tata Passed Away: रतन टाटा यांचे निधन, भारतीय उद्योगजगताचा चेहरा हरपला…
रतन टाटा यांची तब्येत सोमवारी अचानक बिघडल्याचे समोर आले होते. मात्र, त्यांनी स्वतः आयसीयूमध्ये दाखल केल्याच्या दाव्याला अफवा असल्याचे म्हटले होते. आयसीयूमध्ये दाखल केल्याच्या दाव्याचे खंडन करताना रतन टाटा स्वतः म्हणाले होते की, ‘माझ्या प्रकृतीबद्दल अलीकडे पसरलेल्या अफवांची मला माहिती मिळाली. मी सर्वांना खात्री देऊ इच्छितो की, हे दावे निराधार आहेत. माझे वय आणि तब्येत यामुळे मी सध्या आवश्यक वैद्यकीय तपासणी करत आहे. काळजी करण्यासारखे काही नाही. मला बरे वाटत आहे’.
हेदेखील वाचा : Ratan Tata: रतन टाटांचा जन्म, वय, शिक्षण, कुटुंब, उत्तराधिकारी, एकूण संपत्ती नेमकी किती?
त्यानंतर बुधवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांच्या सन्मानार्थ राज्यात आज (दि.10) एक दिवसाचा दुखवटा पाळण्यात येणार आहे. या काळात राज्यातील शासकीय कार्यालयांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येतील. तसेच मनोरंजन किंवा करमणुकीचे कुठलेही कार्यक्रम होणार नाहीत. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली आहे.
शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार
रतन टाटा यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. याबाबतच्या सूचनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. तसेच आज मुंबईमध्ये होणारे सर्व शासकीय कार्यक्रमही रद्द करण्यात आले आहेत. राज्य शासनाचे हे सर्व कार्यक्रम दोन दिवसांत घेण्यात येणार आहेत, अशी माहितीही देण्यात आली आहे.