रतन टाटा यांचे निधन
जगातील मोठे उद्योगपती आणि टाटा सन्सचे अध्यक्ष रतन टाटा यांचे निधन झाले आहे. भारताच्या उद्योगजगताचा तारा आज निखळला. रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक होती त्यामुळे त्यांना मुंबईतील रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. डॉ.शारुख अस्पी गोलवाला यांच्या नेतृत्वाखालील तज्ञांचे पथक रतन टाटा यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून होते. मात्र अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे जाणे भारतीय उद्योगजगतालाच नव्हे तर सर्व भारतीयांसाठी दुख:दायक आहे.
सोमवार दि. 7 ऑक्टोबर रोजी रतन टाटा यांची अचानक बिघडल्याची बातमी समोर येत होती. मात्र त्यांनी स्वतः आयसीयूमध्ये दाखल केल्याच्या दाव्याला अफवा असल्याचे म्हटले होते.आयसीयूमध्ये दाखल केल्याच्या दाव्याचे खंडन करताना रतन टाटा स्वतः म्हणाले होते की, ‘माझ्या प्रकृतीबद्दल अलीकडे पसरलेल्या अफवांची मला माहिती मिळाली.मी सर्वांना खात्री देऊ इच्छितो की हे दावे निराधार आहेत. माझे वय आणि तब्येत यामुळे मी सध्या आवश्यक वैद्यकीय तपासणी करत आहे. काळजी करण्यासारखे काही नाही. मला बरे वाटत आहे. मी तुम्हाला विनंती करतो की जनता आणि माध्यमांनी चुकीची माहिती पसरवणे टाळावे, अशी माहिती रतन टाटा यांनी सोशल मीडियावरुन दिली होती.
टाटा उद्योगसमुहाचे माजी प्रमुख रतन नवल टाटा हे भारतातीलच नव्हे तर जगभरात भारताच्या उद्योगजगताचे चेहरे होते. त्यांच्या दातृत्वासाठी ते कायम ओळखले जात. त्यांना भारत सरकारने पद्मविभूषण (2008) आणि पद्मभूषण (2000) दोन सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरविले होते. ते प्रतिष्ठित कॅथेड्रल आणि जॉन कॉनन स्कूल, बिशप कॉटन स्कूल (शिमला), कॉर्नेल विद्यापीठ आणि हार्वर्डचे माजी विद्यार्थी आहेत.