
समृद्धीवर ५ दिवस वाहतूक बंद राहणार
मुंबई : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा प्रवाशांच्या सोयीसाठी बांधला गेला असून, यामुळे बराच फायदा होत आहे. त्यात नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गावर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिमअंतर्गत मागील काही महिन्यांपासून गॅन्ट्री उभारण्याचे काम सुरु आहे. या कामासाठी वाहतूक ब्लॉक घ्यावा लागत आहे. त्यामुळे हा महामार्ग पाच दिवस वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.
समृद्धी महामार्गाच्या २७ ते ३१ जानेवारीदरम्यान अमरावतीतील महामार्गाच्या अंतराच्या दरम्यान (अमरावतीतील ता.धामणगाव रेल्वे, ता. चांदूर रेल्वे, तां. नांदगाव खंडेश्वर आणि वाशिममील ता. कारंजादरम्यान) १२ टप्प्यात वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यानुसार, मंगळवार ते शनिवारदरम्यान तेथील वाहतूक दुपारच्या वेळेस ४५ ते ६० मिनिटे पूर्णपणे बंद राहणार आहे. काम पूर्ण झाल्यानंतर वाहतूक सुरळीत सुरु होईल. पठाणपूर, धामणगाव येथील साखळी क्रमांक ११०.४०० येथील मुंबई वाहिनीवरील वाहतूक २७ जानेवारीला दुपारी ३ ते दुपारी ४ या वेळेत बंद राहील.
हेदेखील वाचा : Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गाच्या कामात भ्रष्टाचार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप
तसेच पठाणपूर, धामणगाव येथील साखळी क्रमांक ११०.४०० येथील नागपूर वाहिनीवरील वाहतूक २७ जानेवारीला दुपारी १२ ते दुपारी १ या वेळेत बंद राहील. धोत्रा चांदूर रेल्वे येथील साखळी क्रमांक १२५.४०० येथील नागपूर वाहिनीवरील वाहतूक २७ जानेवारीला दुपारी ३ ते दुपारी ४ या वेळेत बंद राहील.
अनेक ठिकाणची वाहतूक बंद
खंबाळा, चांदूर येथील साखळी क्रमांक १३०.४०० येथील नागपूर वाहिनीवरील वाहतूक २८ जानेवारीला दुपारी ३ ते दुपारी ४ या वेळेत बंद राहील. शेलू, नटवा, नांदगाव, खंडेश्वर येथील साखळी क्रमांक १३४.५०० येथील मुंबई वाहिनीवरील वाहतूक २८ जानेवारीला दुपारी १२ ते दुपारी १ या वेळेत बंद राहील.
वाहनचालकांच्या दृष्टीने दिल्या जात आहेत सुविधा
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग सातत्याने होत असलेल्या अपघातांमुळे चांगलाच चर्चेत आहे. पण, आता याच मार्गावर पेट्रोलपंपांनंतर भव्य 16 उपहारगृहे (फुड मॉल) उभारण्यात येणार आहेत. याचा फायदा या महामार्गावरून येणाऱ्या हजारो वाहनचालकांना होणार आहे. थांबा असल्याने संभाव्य अपघातांना आळा बसेल, असे सांगण्यात येत आहे.