
डिसेंबर अखेर ‘महामेट्रो’ मिरा-भाईंदरकरांच्या सेवेत, परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती
मंत्री सरनाईक यांनी सांगितले की, सन 2009 मध्ये जेव्हा या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलो, त्यावेळी येथील नागरिकांना मेट्रोचे स्वप्न दाखवले होते. गेल्या 14 वर्षांमध्ये सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश येताना दिसत आहे. 2014 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नगर विकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्यामुळे दहिसर ते काशीमिरा या मेट्रो प्रकल्पाच्या कामाला गती मिळाली. लवकरच हा मार्ग सुरू झाल्यानंतर मीरा-भाईंदरवासीय मेट्रोने अंधेरीपर्यंत जाऊ शकतील. तसेच तेथून मेट्रो-1 चा वापर करून एअरपोर्ट स्थानक-3 मधून थेट कुलाब्यापर्यंत देखील जाऊ शकतील. त्याचबरोबर, नवीन वर्षात मिरा-भाईंदरवासीयांसाठी छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक मंत्रालय, विधान भवन येथे जाण्यासाठी मेट्रोची नेटवर्कद्वारे सुविधा उपलब्ध असणार आहे.
दहिसर – काशीमिरा मेट्रो डिसेंबर-2026 पर्यंत नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानापर्यंत विस्तारित होणार आहे. त्याबरोबरच वसई – विरार मेट्रो लाईनचे काम देखील लवकरच सुरू करण्यात येईल. त्यामुळे वसई – विरारपासून अंधेरी आणि तिथून विमानतळ स्थानक इंटरचेंजने थेट कुलाब्यापर्यंत मेट्रोची सेवा पुढील काही वर्षांमध्ये सुरू होऊ शकते, अशी आशा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी व्यक्त केली.
दहिसर ते काशीमिरा या नव्या मेट्रो मार्गाला मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांचे (सीएमआरएस) प्रमाणपत्र मिळणे आवश्यक आहे. ते मिळाल्यानंतर डिसेंबर अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या नवीन मेट्रो मार्गाचे लोकार्पण करण्याचे नियोजन करण्यात येईल, अशी माहिती परिवहन मंत्री सरनाईक यांनी दिली.