Sangamner Crime
मोखाडा : मोखाड्यातील कारेगांव शासकीय आश्रमशाळेतील 9 वी तील रूद्राक्ष पागी या आदिवासी विद्यार्थ्यांला शिक्षकाने मारहाण केल्याची घटना घडली आहे. जेवणासाठी झुंबड केल्याच्या क्षुल्लक कारणावरून, ललित अहिरे या शिक्षकाने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. समाज माध्यमातून ही घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे आदिवासी समाजातील विविध संघटनांतील पदाधिकारी संतप्त झाले आहेत. त्यांनी संबंधित मारकुट्या शिक्षकावर कारवाईची मागणी केली आहे.
आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांर्गत चालविल्या जाणाऱ्या मोखाड्यातील कारेगाव येथील शासकीय आश्रमशाळेत रुद्राक्ष पागी नववीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. शुक्रवारी 12 जानेवारीला दुपारच्या जेवनाच्यावेळी आश्रमशाळेतील विद्यार्थीनी एकच झुंबड केली. त्यावेळी विद्यार्थ्यांना शिस्त न लावता येथील शिक्षक ललित एल अहिरे यांने तुझ्या हातात दोन लाडू कसे, असे विचारत रूद्राक्षला काठीने बेदम मारहाण केली. त्यामुळे तो जमिनीवर कोसळला आणि प्रचंड घाबरला. या घटनेचे तीव्र पडसाद सोशल मीडियावर उमटले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून विद्यार्थ्यांला मारहाण आणि त्याच्या अंगावर ऊमठलेल्या व्रणाचे फोटो सर्वत्र प्रसारित होत आहेत. त्यामुळे आदिवासी संघटना आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी संबंधित मारकुट्या शिक्षकावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
कारेगाव आश्रमशाळा व्यवस्थापनात कोणाचाच पायपोस कोणाच्याच पायात राहिला नसल्याची ओरड पालक वर्गातून केली जात आहे. या आश्रमशाळेतील वस्तीगृह अधिक्षक दुर्वे हे देखील आश्रमशाळेत उपस्थित नव्हते. मात्र ते परत आले तेव्हा त्यांनी या विद्यार्थ्यांला रूग्णालयात नेले असून त्याच्यावर उपचार करण्यात आले आहेत. दरम्यान गरीब आदिवासी विद्यार्थी असल्याने त्याच्या आई वडीलांवर शिक्षका विरोधात तक्रार करु नये यासाठी दबाव टाकला गेल्याची मोठी चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे.
याबाबत कारेगाव आश्रमशाळेचे मुख्याध्यापक विवेक घरटे यांच्याशी संपर्क साधून चौकशी केली असता त्यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. तसेच शिक्षक एल एल अहिरे यांना या मारहाणी बाबत कडक शब्दात समज दिली असून त्यांनी रुद्राक्षच्या पालकांची माफी मागितली असून पून्हा असे कृत्य करणार नसल्याचे सांगितल्याची माहिती घरटे यांनी दिली आहे.