वाल्मिक कराडला २६ पोलीस अधिकाऱ्यांकडून मदत; तृप्ती देसाईंनी पुरावेच दिले
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची ज्या खंडणी प्रकरणातून हत्या झाल्याचा संशय आहे. त्या खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडला अटक झाली असून मोक्का अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वाल्मिक कराड सध्या तुरुंगात आहे. मात्र त्याला पोलीस अधिकाऱ्यांकडून मदत केली जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केला आहे. अशा २६ पोलीस अधिकाऱ्यांची यादी त्यांनी पोलीस अधीक्षकांकडे सुपूर्द केली आहे.
बीड जिल्हा पोलीस दलात २६ अधिकारी वाल्मिक कराडच्या मर्जीतील असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केला होता. त्यांच्या आरोपांनंतर बीड पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली होती. बीड पोलिसांनी दिलेल्या नोटिसीनंतर तृप्ती देसाई अधीक्षक कार्यालयात हजर झाल्या. त्यानंतर त्यांचा बीड अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी जबाब घेतला.
बीड जिल्हा पोलीस दलातील 26 अधिकारी आणि कर्मचारी संतोष देशमुख प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड याच्या मर्जीतील असल्याची तक्रार तृप्ती देसाई यांनी केली होती. या तक्रारीनंतर बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देसाई यांना दिले होते. याच आदेशावरून आज तृप्ती देसाई पोलीस अधीक्षक कार्यालयात हजर राहिल्या. यादरम्यान पोलीस दलातील २६ अधिकारी कर्मचाऱ्यांचे पुरावे देसाई यांनी अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांना सादर केले.
‘बीड पोलीस दलात २६ अधिकारी कर्मचाऱ्यांचे पुरावे दिले आहेत. त्यासंदर्भात माझा जबाब घेण्यात आला आहे. याचे सर्व पुरावे पेन ड्राइवच्या माध्यमातून दिले आहेत. त्यामुळे लवकरात लवकर या अधिकारी कर्मचाऱ्यांना बीड जिल्ह्याच्या बाहेर पाठवावे. त्यातील अनेक कर्मचारी एकाच पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. आज घेण्यात आलेल्या जबाबानंतर याची गोपनीय चौकशी करू, असं आश्वासन तृप्ती देसाई यांना देण्यात आले आहे.