Tukaram Mundhe: तुम्हाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायला आवडेल का? विद्यार्थ्याच्या प्रश्नावर तुकाराम मुंढेंनी दिलं स्पष्ट उत्तर

Tukaram Mundhe: पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजच्या युथ फेस्टिव्हलमध्ये FDA कमिशनर तुकाराम मुंढे यांना एका विद्यार्थ्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याबाबत प्रश्न विचारला. यावर मुंढेंनी आपल्या प्रशासकीय कारकिर्दीचा अनुभव सांगत भविष्याबाबत सूचक उत्तर दिले. यावेळी त्यांनी तरुणांना फिटनेस, प्रोटीन सप्लिमेंट्स आणि आरोग्यदायी जीवनशैलीबाबतही महत्त्वाचा सल्ला दिला.
तुम्हाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायला आवडेल का? विद्यार्थ्याच्या प्रश्नावर तुकाराम मुंढेंनी दिलं स्पष्ट उत्तर
तुम्हाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायला आवडेल का? विद्यार्थ्याच्या प्रश्नावर तुकाराम मुंढेंनी दिलं स्पष्ट उत्तरतुम्हाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायला आवडेल का? विद्यार्थ्याच्या प्रश्नावर तुकाराम मुंढेंनी दिलं स्पष्ट उत्तर
Published on: 
Updated on: 
  • तुम्हाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायला आवडेल का?

  • विद्यार्थ्याच्या प्रश्नावर तुकाराम मुंढेंनी दिलं स्पष्ट उत्तर

  • प्रोटीन सप्लिमेंट्सच्या वापराबाबत तरुणांना सल्ला

Tukaram Mundhe: आपल्या कडक शिस्तीच्या आणि नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याच्या कार्यपद्धतीमुळे चर्चेत असलेले FDA कमिशनर तुकाराम मुंढे यांची तरुणांमध्येही मोठी लोकप्रियता आहे. नुकतेच ते पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजच्या युथ फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाले होते. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये त्यांना भेटण्यासाठी आणि त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी मोठी उत्सुकता पाहायला मिळाली. विद्यार्थ्यांनी त्यांना अनेक प्रश्न विचारले. मात्र, एका विद्यार्थ्याने विचारलेल्या प्रश्नाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. 'तुम्हाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हायला आवडेल का?' असा थेट सवाल विद्यार्थ्याने मुंढेंना केला.(Tukaram Mundhe)

या प्रश्नाला उत्तर देताना तुकाराम मुंढे यांनी आपल्या प्रशासकीय कारकिर्दीतील अनुभव सांगितला. यावेळी त्यांनी सांगितले की, अनेकदा लोक अशा प्रश्नांबाबत आधीच निष्कर्ष काढतात. मात्र, दहा वर्षांपूर्वी कोणी आपल्याला FDA कमिशनर व्हाल का, असे विचारले असते तर त्याचे उत्तर 'मला माहीत नाही' असेच असते. कारण दहा वर्षांपूर्वी आपण सोलापूरचे जिल्हाधिकारी होतो. त्यावेळी अन्न व औषध प्रशासनाच्या कामकाजाची आपल्याला फारशी माहिती नव्हती.

आपल्या आयुष्यात भविष्यात काय बनायचे, याची ठरावीक इच्छा यादी कधीच नव्हती, असेही त्यांनी स्पष्ट केले. आपण वर्तमानात जगणे पसंत करतो. सध्या आपण लोकसेवक आहोत आणि या पदाकडे केवळ नोकरी म्हणून पाहत नाही. आपले काम पूर्ण मनापासून आणि मेहनतीने करणे, तसेच प्रत्येक व्यक्तीचा आत्मसन्मान आणि प्रतिष्ठा जपणे हीच आपल्या कामाची ओळख असल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यात काय होईल, हे वेळच ठरवेल, असे सूचक उत्तर त्यांनी दिले.

प्रोटीन सप्लिमेंट्सच्या वापराबाबत तरुणांना सल्ला

युथ फेस्टिव्हलमध्ये तुकाराम मुंढे यांनी तरुणांच्या फिटनेसविषयक आवडीवरही भाष्य केले. लवकर बॉडी बनवण्याच्या नादात बाजारातील आकर्षक मार्केटिंग दाव्यांना बळी पडू नका, असा सल्ला त्यांनी दिला. केवळ प्रोटीन सप्लिमेंट्स घेतल्याने शरीराचे स्नायू तयार होत नाहीत. त्यासाठी नियमित व्यायाम, नैसर्गिक प्रोटीनयुक्त आहार, पुरेशी झोप आणि आरोग्यदायी जीवनशैली आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

बाजारात मिळणाऱ्या प्रत्येक प्रोटीन उत्पादनामध्ये प्रत्यक्षात किती प्रोटीन आहे, याबाबत ग्राहकांनी जागरूक राहणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रोटीन पावडर किंवा इतर सप्लिमेंट्स खरेदी करताना उत्पादनावरील लेबल काळजीपूर्वक वाचावे. कोणतेही सप्लिमेंट घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर FDA ची कारवाई

प्रोटीन सप्लिमेंट्स किंवा इतर आरोग्यविषयक उत्पादनांबाबत चुकीचे दावे केले जात असल्यास ग्राहकांनी FDA कडे तक्रार करावी, असेही मुंढे यांनी सांगितले. जिम चालक, सप्लिमेंट विक्रेते आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स यांनी उत्पादनांची जाहिरात करताना दिशाभूल करणारे दावे करू नयेत, असा इशाराही त्यांनी दिला.

अशा प्रकारचे भ्रामक दावे केल्यास संबंधितांविरोधात कठोर कारवाई केली जाऊ शकते. यामध्ये १० लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच प्रोटीन पावडर किंवा प्रोटीन शेकची विक्री करणाऱ्या संबंधित आस्थापनांकडे आवश्यक FSSAI परवाना असणे बंधनकारक असल्याचेही त्यांनी नमूद केले. एकूणच, फर्ग्युसन कॉलेजमधील या संवादातून तुकाराम मुंढे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या प्रश्नावर भविष्याबाबत सूचक भूमिका मांडली, तर तरुणांना फिटनेस आणि सप्लिमेंट्सच्या बाबतीत सजग राहण्याचा महत्त्वाचा संदेशही दिला.