राज्यात थंडीचा जोर आणखी वाढणार; नागपूरसह भंडारा, गोंदिया राहणार थंड (फोटो सौजन्य - iStock)
नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये थंडीचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे.
मुंबईत सध्या कडाक्याची थंडी नसून सौम्य गारवा जाणवत आहे.
सध्या राज्यातील तापमानात मोठ्या प्रमाणात घट दिसून येत आहे. काही जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा पारा घसरल्याचेही चित्र आहे. मात्र मुंबईत तापमान सामान्य असून, सौम्य गारवा जाणवत आहे. मुंबईकरांना सध्या कडाक्याच्या थंडीचा अनुभव नसून, तापमान सामान्य पातळीच्या आसपास आहे. शनिवारी मुंबईत किमान तापमान १६ अंश, रविवारी १७ अंशांपर्यंत होते. मात्र, सोमवारी सकाळी त्यात वाढ होऊन पारा २० अंशांवर पोहोचला. भारतीय हवामान विभागाच्या नोंदीनुसार, सोमवारी सांताक्रूझ येथे २०.१ अंश, तर कुलाबा येथे २२.२ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवण्यात आले. ही तापमाने सरासरीपेक्षा अनुक्रमे ०.५ आणि ०.९ अंशांनी कमी होती. त्यामुळे मुंबईत सध्या सौम्य गारवा आहे.
दरम्यान, विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या आठ जिल्ह्यांमध्ये थंडीचा जोर अधिक जाणवण्याची शक्यता आहे. हवामान अभ्यासक आणि भारतीय हवामानशास्त्र विभागाचे निवृत्त हवामानशास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी हा अंदाज व्यक्त केला आहे. सोमवारी राज्यातील काही भागांत थंडी जाणवली.
महाराष्ट्राच्या दिशेने वारे वाहण्याची शक्यता
सध्या महाराष्ट्रावर जमिनीपासून सुमारे तीन किलोमीटर उंचीपर्यंत प्रत्यावर्ती चक्रीय वाऱ्यांची स्थिती आहे. राज्यावरील हवेचा दाब १०१४ हेक्टापास्कल असून, उत्तर भारतात तो १०१६ हेक्टापास्कलपर्यंत वाढलेला आहे. या हवेच्या दाबातील फरकामुळे उत्तरेकडील थंड आणि कोरडे वारे ईशान्येकडून महाराष्ट्राच्या दिशेने वाहण्याची शक्यता आहे. त्यातून राज्याच्या भूभागात थंडीचे संक्रमण अधिक प्रभावी होऊ शकते. ‘अक्वान’ चक्रीवादळाने बदललेल्या दिशेमुळेही महाराष्ट्रातील थंडीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगण्यात आले आहे.
FAQ
1. महाराष्ट्रात थंडीचा जोर कधी वाढणार आहे?
नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत राज्यातील ग्रामीण भागात कडाक्याची थंडी पडण्याचा अंदाज आहे.
2. राज्यातील कोणत्या जिल्ह्यांमध्ये थंडी अधिक जाणवणार आहे?
नागपूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये थंडीचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे.
3. राज्यात थंडी वाढण्यामागचे कारण काय आहे?
उत्तर भारतातील वाढलेला हवेचा दाब आणि ईशान्येकडून वाहणारे थंड व कोरडे वारे यामुळे तापमानात घट होण्याची शक्यता आहे.






