Tukaram Mundhe Karad Lecture
कराड नगरपरिषदेच्या शारदीय व्याख्यानमालेतील सातवे पुष्प गुंफण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे शनिवारी, दि. १७ ऑक्टोबर रोजी कराडमध्ये येत आहेत. सायंकाळी सहा वाजता यशवंतराव चव्हाण स्मृती सदन (टाऊन हॉल) येथे त्यांचे व्याख्यान होणार आहे. मुंढे यांच्या व्याख्यानाबाबत तरुणाईमध्ये उत्सुकता असून, मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
संभाव्य गर्दीचा विचार करून नगरपरिषदेने मुख्य प्रेक्षागृहासह लगतच्या सभागृहात बैठक व्यवस्था करण्याचे नियोजन केले आहे. तसेच टाऊन हॉल परिसरात स्क्रीन लावून बाहेर उपस्थित असलेल्या नागरिकांनाही व्याख्यानाचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे स्थळ न बदलता उपलब्ध जागेचा अधिकाधिक उपयोग करून गर्दीचे व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न नगरपरिषदेकडून केला जाणार आहे.
व्याख्यानाला येणाऱ्या नागरिकांनी शक्यतो खासगी वाहनांऐवजी पायी येण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन नगराध्यक्ष यादव यांनी केले आहे. दुचाकी वाहनांसाठी साई मंदिरासमोरील प्रवेशद्वारातून विठामाता विद्यालयात, तर चारचाकी वाहनांसाठी शिवाजी विद्यालयात पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.नागरिकांनी वाहने टाऊन हॉल परिसरात आणू नयेत, निश्चित केलेल्या पार्किंगच्या ठिकाणीच वाहने लावावीत आणि वाहतुकीला अडथळा होणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही नगराध्यक्षांनी स्पष्ट केले. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर खर्चाला मर्यादा घालत व्याख्यानाचा लाभ अधिकाधिक नागरिकांना मिळावा, यासाठी नगरपरिषदेकडून नियोजन करण्यात येत आहे.






