Arrest
वाई : भुईंज येथे दोन दिवसांपूर्वी अनिल नामदेव कुचेकर यांचा दगड, दांडक्याने मारहाण करून निर्घृण खून झाला होता. खुनासारख्या घटनेची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी तत्काळ संशयितांचे धागेदोरे शोधून तपासाला सुरुवात केली होती. दोन्ही संशयितांना २४ तासांत अटक करून आज न्यायालयात हजर केले असता त्यांना सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पोलिस उपअधीक्षक बाळासाहेब भालचिम यांनी सांगितले की, अनिल व संशयित रोहित राजू बडवे (वय २३) व आशिष मानसिंग शिंदे हे तिथे हमालीचा व्यवसाय करीत होते. दि. २४ रोजी रात्री तिघेही दारू पिताना त्यांच्यात वादावादी झाली. मयत अनिल याने संशयित रोहित व आशिष यांना आईवरून शिव्या दिल्याचा तसेच रोहित याच्या नातेवाईक महिलेला शिवीगाळ करीत असल्याचा राग मनात धरून अमानुषपणे बेशुद्ध पडेपर्यंत मारहाण केली. यातच अनिल याचा मृत्यू झाला. त्यानंतर सकाळी खुनाची घटना उघडकीस आली. त्यानंतर सकाळी संशयित रोहित राजू बडवे त्याठिकाणी आला. त्याने अनिल यास पाहिले व दुसऱ्याला सांगितले, की यांचा कार्यक्रम झाला आहे. त्यानंतर दोन्ही संशयित दुचाकीवरून पुण्याकडे फरारी होण्यासाठी गेले. मात्र, त्यांच्या दुचाकीचे पेट्रोल संपल्याने त्यांनी बंद असलेला मोबाईल सुरू केला व पोलिसांना लोकेशन मिळाले. पोलिसांनी त्यावेळी त्यांच्यावर झडप घालून त्यांना अटक केली.
या तपासात पोलिस अधीक्षक समीर शेख, वाईचे पोलिस उपअधीक्षक बाळासाहेब भालचिम, वाईचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे, भुईज पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे, मेढा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष तासगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशाल भंडारे, सहायक फौजदार वैभव टकले, विजय अवघडे, राजकुमार किर्दत, पोलिस हवालदार नितीन जाधव, अरुण दगडे, चंद्रकांत भोसले, गोकूळ बोरसे, सुहास कांबळे, सुशांत धुमाळ, पोलिस कॉन्स्टेबल सोमनाथ बल्लाळ, रविराज वर्णेकर, सागर मोहिते, किरण निंबाळकर, सतीश कदम, प्रशांत ठोंबरे, वाई पोलिस ठाण्याचे डीबी पथकाचे श्रावण राठोड, हेमंत शिंदे, प्रेमजित शिर्के, मेढा पोलिस ठाण्याचे सनी काळे यांनी या कारवाईत भाग घेऊन संशयितांना २४ तासांच्या आत अटक केली.