यवत : वरवंड ( ता. दौंड ) येथील कासव शिकार प्रकरणी पुणे प्रादेशिक वन विभागाचे उप वनसंरक्षक राहुल पाटील यांनी गंभीर दखल घेतली असून वन अधिकाऱ्यांनी या प्रकरणी आणखी दोघांना अटक केली आहे. त्यामुळे या प्रकरणी अटक केलेल्या आरोपींची संख्या आता चार इतकी झाली आहे.
दादा सावंत, नाना सावंत, शंकर सावंत, भीमा सावंत ( सर्व रा. वरवंड, ता. दौंड) अशी अटक आरोपींची नावे आहेत. कासवाच्या शिकारीचे प्रकरण उजेडात आल्यानंतर सहाय्यक वन संरक्षक दीपक पवार व दौंड तालुका वन परिक्षेत्र अधिकारी कल्याणी गोडसे यांनी आरोपींच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली. या प्रकरणातील चारही आरोपींना दौण्ड न्यालयालयाने वन विभागाची कोठडी सुनावली आहे.
वरवंड येथील कानिफनाथ नगर भागात खाण्याच्या उद्देशाने कासवाला चुलीवर भाजून ते कापल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच वन परिमंडळ अधिकारी शीतल खेंडके आणि वनरक्षक शीतल मेरंगल यांनी वन कर्मचाऱ्यासह त्याठिकाणी छापा टाकून दोन आरोपीना रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर आणखी दोघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. या चार आरोपींना सात दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.