Uddhav Thackeray's concern increased as Nana Patole claimed the post of Chief Minister
मुंबई : राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. केंद्री. निवडणूक आयोग आढावा घेऊन गेल्यामुळे कोणत्याही क्षणी निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. यामुळे महायुतीसह महाविकास आघाडी जोरदार तयारीला लागले आहे. महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रिपदावरुन रान पेटले आहे. राज्याचे पुढचे मुख्यमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यामध्ये आता कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत सूचक वक्तव्य केले आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीमधील दुसरे घटक पक्ष असलेल्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची झोप उडाली आहे.
राज्यामध्ये बंडाचे राजकारण झाल्यानंतर ही पहिलीच विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे यंदाची विधानसभा निवडणूक जोरदार रंगणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असणार याची उत्सुकता फक्त राजकीय वर्तुळामध्ये नाही तर राज्यातील सर्व जनतेला देखील लागले आहे. महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रिपदावरुन वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे. यापूर्वीचे महाविकास आघाडीचे सरकार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये कार्यरत होते. मात्र बंडाच्या राजकारणामुळे उद्धव ठाकरे यांना पायउतार व्हावे लागले. त्यामुळे निवडणुकीनंतर महाविकास आघाडीकडे जनतेचा कौल असेल तर पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याचा ठाकरे गटाचा निश्चय आहे.
तर दुसऱ्या बाजूला लोकसभा निवडणूकीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेल्या आणि निवडणुकीच्या निकालामध्ये बाजी मारलेला कॉंग्रेस पक्षाच्या देखील महत्त्वकांशा वाढल्या आहेत. कॉंग्रेस हाच मोठा भाऊ आहे, त्यामुळे कॉंग्रेसकडून सुद्धा मुख्यमंत्रिपदावर दावा केला जात आहे. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सूचक विधान केले आहे. मीच मुख्यमंत्री होणार असे निश्चयाने नाना पटोले म्हणाले आहेत. त्यांच्या या विधानामुळे उद्धव ठाकरे यांची चिंता वाढवली आहे.
यामुळे महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रिपदावर रस्सीखेच सुरु असल्याचे स्पष्ट आहे. शरद पवार यांनी निवडणूकीनंतर मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर केला जाईल, अशी भूमिका घेतली आहे. तर निवडणूकीच्या आधीच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. त्यामुळे आता निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले तर मुख्यमंत्री नाना पटोले होणार की उद्धव ठाकरे यांची चर्चा रंगली आहे.