पुण्यात तापमानाचा पारा 41 अंश पार; येत्या दोन दिवसांत...
मालेगाव : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील बहुतांश भागांत उन्हाचा कडाका जाणवत आहे. त्यात या उष्णतेचा सामना करणाऱ्या मालेगाव तालुक्यात बुधवारी दुपारी पावसाने अचानक हजेरी लावली. शहरासह तालुक्यातील काही भागांत तुरळक पाऊस पडला. मात्र, या पावसाने अपेक्षित गारवा मिळण्याऐवजी वातावरण आणखी उष्ण झाले. ढगाळ हवामान आणि दमट वातावरणामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
यंदाच्या उन्हाळ्यात अपेक्षेपेक्षा लवकर तापमानात वाढ झाली आहे. एप्रिल व मे उन्हाळ्याचे अत्यंत उष्ण महिने मानले जात असले तरी यावर्षी मार्चमध्येच उन्हाचा तडाखा जाणवू लागला. मालेगाव तालुक्यात 15 मार्चपासून तापमानाचा पारा झपाट्याने वाढला असून, मार्च महिन्यातच पारा 38 अंशांच्या पुढे गेल्याने नागरिकांना उष्णतेचा फटका बसू लागला. तापमान वाढल्यामुळे दुपारी रस्त्यावर शुकशुकाट जाणवत होता. अनेकांकडून दुपारी घराबाहेर जाणे टाळले जात असून, उन्हाचा त्रास मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून वातावरणात बदल दिसून येत होता. आकाशात ढगांची दाटी झाली होती तर काही ठिकाणी वाऱ्याचा वेगही वाढला होता. अशा परिस्थितीत सोमवारी सायंकाळच्या सुमारास अचानक पावसाला सुरुवात झाली. हा पाऊस काही वेळापुरताच राहिला. मात्र, त्यानंतर उष्णता अधिक वाढल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. पुढील दोन महिने उन्हाळ्याचे असल्याने सर्वाधिक तीव्रता जावणू शकते. त्यामुळे तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता असून, नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
सावधगिरी बाळगण्याची गरज
आरोग्य तज्ज्ञांनी उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी आवश्यक सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. भरउन्हात घराबाहेर पडणे टाळावे, पुरेशी विश्रांती घ्यावी, भरपूर पाणी प्यावे आणि हलका आहार घ्यावा, असा सल्ला दिला जात आहे. लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. उन्हामुळे उष्माघाताचा धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे शक्य असल्यास उन्हाच्या वेळेत बाहेर जाणे टाळावे.