पुणे : पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) हद्दीतून उरूळी देवाची (Uruli Devachi) आणि फुरसुंगी (Fursungi) ही गावे वगळून स्वतंत्र नगरपालिका अस्तित्वात आली आहे. यासंदर्भातील आदेश शुक्रवारी राज्य सरकारने जारी केले आहेत.
पुणे महापालिकेमध्ये २०१७ मध्ये ११ गावांचा समावेश करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने उरूळी देवाची आणि फुरसुंगी या गावांचा समावेश होता. वाढीव मिळकत कर आणि पायाभूत सुविधा मिळत नसल्याचा आरोप करत स्थानिक नागरिकांनी ही दोन्ही गावे महापालिकेतून वगळण्याची मागणी केली होती. तसेच माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी महापालिका सुविधा देत नसल्याने समाविष्ट गावांची स्वतंत्र महापालिका करावी, अशी मागणी केली होती.
यापार्श्वभूमीवर डिसेंबर महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उच्चस्तरीय बैठक घेऊन ही गावे वगळण्याचा निर्णय घेतला होता. याबाबतचे अध्यादेश आर्थिक वर्षाच्या शेवटी काढण्यात आले आहे. यामुळे आजपासून उरुळी देवाची – फुरसुंगी या दोन गावांची नगरपालिका अस्तित्वात येणार आहे.
पुणे महानगरपालिका हद्दीतून वगळण्यात आलेले क्षेत्र पुढीलप्रमाणे :
फुरसुंगी स.नं. 193, 192 पै, 194, 195 पै, (कचरा डेपो) चे क्षेत्र वगळून गावठाणासह संपूर्ण महसूली – गावाचे क्षेत्र, उरुळी देवाची स.नं. 30,31 व 32 पै, (कचरा डेपो) चे क्षेत्र वगळून गावठाणासह संपुर्ण महसुली गावाचे क्षेत्र.
येथील कचरा डेपो हा महापालिकेच्या हद्दीतच राहणार आहे. टी. पी. स्कीम बाबत अद्याप निर्णय झालेला नाही. या टीपी स्कीम पालिकेकडेच राहाव्यात,अशी मागणी शासनाकडे करणार आहोत. या दोन्ही गावातील कर्मचारी महापालिकेकडे वर्ग करण्यात आले होते. ते कर्मचारी वर्गीकरणाचा निर्णय शासनस्तरावर होईल.