लक्ष्मण हाके व वंचित नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट
जालना : राज्यामध्ये सध्या आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आहे. अंतरवली सराटी गावाजवळ आता ओबीसी आरक्षणाच्या रक्षणासाठी लक्ष्मण हाके यांनी देखील उपोषण केले आहे. आज त्यांच्या उपोषणाचा आठवा दिवस आहे. अनेक ओबीसी नेत्यांनी त्यांची भेट घेत समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. यानंतर आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी देखील लक्ष्मण हाके यांची उपोषणस्थळी जाऊन भेट घेतली आहे.
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावे अशी जोरदार मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. मात्र मराठा समजाला आरक्षण स्वतंत्र द्यावे, ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नये अशी मागणी लक्ष्मण हाके यांनी केली आहे. त्यासाठी हाकेंनी मागील आठ दिवसांपासून आमरण उपोषण केले आहे. त्यांनी पाणी देखील घेण्यास नकार दिला असून उपचारस देखील नकार दिला आहे. यापूर्वी पंकजा मुंडे यांनी देखील हाके यांची उपोषणस्थळी जाऊन भेट घेतली. यानंतर आता प्रकाश आंबेडकर यांनी देखील भेट घेतली आहे.
काय म्हणाले प्रकाश आंबेडकर ?
प्रकाश आंबेडकर यांनी लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाच्या मंचावर जाऊन संवाद साधला. प्रकाश आंबेडकर म्हणाले, “मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर त्यांचे वेगळे ताट दिले पाहिजे. दोघांना एकमेकांसमोर भिडवत राहणं आणि विधानसभेपर्यंत हे भिडवत राहतील, अशी माझी धारणा आहे. भाजप संविधान बदलेल, या भीतीने संविधानाच्या बाजूने निकाल लागला. त्यामुळे जनतेचा कल महाविकास आघाडीकडे गेला. मनोज जरांगे यांच्याशी बोलत असताना सगेसोयरे शब्द जे ते म्हणत होते, त्याबद्दल मी सल्ला दिला होता. सगेसोयरे शब्दाची व्याख्या तुम्ही करून घेतली पाहिजे किंवा कोणाला तरी करून द्यायला पाहिजे, जोपर्यंत व्याख्या काय होते त्यातले नेमकं काय ते कळत नाही,” असं स्पष्ट मत वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मांडलं.