
14 farmers commit suicide in Wardha district during Diwali
Wardha farmers suicide: दिवाळीचा सण आनंदाचा आणि उत्साहाचा सण असतो. अलीकडच्या काळात देशातच नव्हे तर परदेशातही दिवाळीचा सण साजरा होऊ लागला आहे. पण याच दिवाळीला गालबोट लागले आहे. यंदाची दिवाळी वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी काळरात्र ठरली. गेल्या महिनाभरात विदर्भ, मराठवाड्यात अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले. अतिवृ्ष्टीमुळे पिकांवर रोग आणि कीटकांच्या प्रादुर्भाव वाढला, उत्पादनात मोठी घट झाली. ज्या शेतकऱ्यांनी त्यांचे उर्वरित उत्पादन बाजारात आणले त्यांना योग्य किंमत मिळाली नाही.
सर्व बाजूंनी आलेल्या संकटामुळे शेतकऱ्यांना दु:खाचा डोंगर कोसळला. परिस्थिती इतकी गंभीर झाली की, ऐन दिवाळी शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखी टोकाची पावले उचलली. मिळालेल्या माहितीनुसार, १० ते २५ ऑक्टोबर या काळात एकट्या वर्धा जिल्ह्यात सुमारे १४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, ज्यात एका महिला शेतकऱ्याचाही समावेश आहे. महिला शेतकऱ्याचा मुलगा बँकेच्या कर्जामुळे त्रस्त होता, ज्यामुळे संपूर्ण कुटुंब चिंतेत बुडाले होते.
US Navy: अपघात की घातपात! अमेरिकेच्या नौदलाचे विमान आणि हेलिकॉप्टरचा अपघात
कर्जाच्या या मानसिक तणावातून एका महिला शेतकऱ्याने विहिरीत उडी मारून आपले जीवन संपवले. गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले. यावर्षी शेतकरी चांगल्या पिकाची आशा बाळगून होते. जिल्ह्यात सुमारे ४.३२ लाख हेक्टरवर खरीप पिकांची पेरणी झाली, ज्यामध्ये २.२५ लाख हेक्टरवर कापूस आणि १.५ लाख हेक्टरवर सोयाबीनचा समावेश होता.
शेतकऱ्यांनी पिके तयार करण्यासाठी खूप मेहनत घेतली, परंतु अतिवृष्टीमुळे लाखो हेक्टरवरील पीके पाण्याखाली गेली. शेतकऱ्यांनी महागडी औषधे खरेदी करून रोग आणि कीटकांपासून पिकांचे संरक्षण करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु वेळोवेळी मुसळधार पावसाने त्यांचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पिके वाहून गेली, ज्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा खर्चही वसूल करणे कठीण झाले. दिवाळीपूर्वी पीक न आल्याने शेतकऱ्यांना त्यांचे धान्य बाजारात विकता आले नाही. र
आर्थिक संकट, वाढते कर्ज, कुटुंबाचा सांभाळ, मुलांचे शिक्षण, आजार आणि मुलींचे लग्न यांसारख्या जबाबदाऱ्यांमुळे शेतकऱ्यांच्या चिंता अधिकच वाढल्या आहेत. सरकारकडून मदत पॅकेज जाहीर करण्यात आले असले तरी, दिवाळीनंतरही ही मदत प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हातात पोहोचलेली नाही.
अशा कठीण परिस्थितीत बँक आणि सावकारांचे कर्ज कसे फेडायचे, हा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. आर्थिक निराशा आणि मानसिक तणावामुळे अनेक शेतकऱ्यांनी दिवाळीसारख्या आनंदाच्या सणातही आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले.
तज्ज्ञ आणि शेतकरी संघटनांचे म्हणणे आहे की, जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. जर सरकार आणि प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना केल्या नाहीत, तर हे संकट आणखी तीव्र होईल.
शेतकरी संघटनांनी, बाधित शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी, कर्जमाफीसारखे उपाय तातडीने राबवावेत, जेणेकरून शेतकरी पुन्हा स्वावलंबी बनू शकतील आणि अशा दुःखद घटना टाळता येतील.’ अशी मागणी केली आहे.