हसन मुश्रीफ यांनी वाशिम जिल्ह्याचं पालकमंत्रिपद सोडलं; कारण देत म्हटलं...
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यातच धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा मंगळवारी (दि.4) द्यावा लागला होता. तर दुसरीकडे, पालकमंत्रिपदावरून महायुतीमध्ये धुसफूस सुरुच आहे. असे असताना आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी वाशिम जिल्ह्याचं पालकमंत्रिपद सोडलं आहे. याचं कारणही त्यांनी दिलं आहे.
राज्यात भाजप-शिवसेना (शिंदे गट)-राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांचे सरकार सत्तेवर आले आहे. त्यानुसार, कोल्हापूरचे पालकमंत्रिपद शिवसेनेकडे गेलं आहे. सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे हा पदभार आहे. त्यामुळे आबिटकरांच्या निवडीवर मुश्रीफांची नव्हे, तर शिवसेना नेते राजेश क्षीरसागर यांचीही नाराजी लपून राहिली नाही. हसन मुश्रीफ यांना कोल्हापूरपासून थेट वाशिम जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली होती. 26 जानेवारीनिमित्त ध्वजारोहण कार्यक्रमासाठी मुश्रीफ वाशिमला पोहोचले. मात्र, शासकीय ध्वजरोहणाचा कार्यक्रम पार पडताच कोणतीही बैठक न घेता त्यांनी थेट पुन्हा कोल्हापूर गाठलं होतं.
वाशिम जिल्हाला लागलेला ‘झेंडा टू झेंडा’ पालकमंत्री हा डाग पुसू आणि जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा दिली जाईल, असे आश्वासन हसन मुश्रीफ यांनी दिले होते. मात्र, त्यांची घोषणा फक्त घोषणाच राहिली आहे.
कोल्हापूरचे पालकमंत्रिपद न मिळाल्याने नाराजी
वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांना कोल्हापूरच्या पालकमंत्रिपदी संधी न मिळाल्याने ते नाराज होते. त्यांची नाराजीही लपून राहिलेली नाही. 26 जानेवारीला ध्वजारोहण करून आल्यानंतर वाशिमकडे फिरकून परत न गेलेल्या हसन मुश्रीफ यांनी आता जबाबदारी सोडली आहे.
काय दिलंय राजीनाम्याचं कारण?
मंत्री म्हणून काम करताना कोल्हापूर, मुंबई, वाशिम असा सातत्याने 800 किमीचा प्रवास करणं शक्य नसल्याचे सांगत त्यांनी पालकमंत्रिपद सोडल्याची माहिती सध्या दिली जात आहे. त्यामुळे आता वाशिम जिल्ह्याला लवकरच नवीन पालकमंत्री मिळणार आहे. सध्यातरी क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे या पदाचा कार्यभार सोपवला जाणार असल्याची माहिती आहे.