
पिंपरी-चिंचवडमध्ये पाच दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प, नागरिक त्रस्त; महापालिकेवर जोरदार टीका
शहरातील अनेक भागात कोरडे नळ
पिंपळे गुरव, दिघी दत्तनगर, आकुर्डी, प्राधिकरण, निगडी रुपीनगर, भोसरी, बिजलीनगर, शाहूनगर आणि चिखली या भागांमध्ये कमी दाब, पाणीगळती आणि अनियमित पुरवठा यामुळे पाणीटंचाई तीव्र झाली आहे. काही ठिकाणी नळ चार ते पाच दिवस कोरडे राहिल्याने नागरिकांनी पाणी विकत घेणे किंवा खासगी टँकर बोलावणे हाच मार्ग अवलंबला. परिणामी पाणी विक्री केंद्रांवर लांबच लांब रांगा दिसून आल्या आणि नागरिकांवर अनावश्यक आर्थिक बोजा पडला. निगडी-प्राधिकरण सेक्टर २८ मध्ये सलग चार दिवस पाणीपुरवठा बंद होता. शनिवारीदेखील पाणीपुरवठा न झाल्याने महापालिकेने अवघे दोन टँकर पाठवले; मात्र ते लोकसंख्येच्या तुलनेत अत्यंत अपुरे ठरले. परिस्थिती पाहता सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत खासगी टँकर आणि पाण्याचे जार नागरिकांसाठी उपलब्ध करून दिले.
रावेत पंपिंग स्टेशनची वारंवार बिघाडे
चिखली, मोरेवस्ती, म्हेत्रेवस्ती आणि घरकुल भागाला रावेत पंपिंग स्टेशनमार्फत पाणीपुरवठा केला जातो. मात्र वारंवार होणाऱ्या बिघाडांमुळे येथे पुरवठा ठप्प राहत असून, लोकांचे दैनंदिन व्यवहार पूर्णपणे विस्कळीत झाले आहेत. “या घनदाट लोकवस्तीच्या भागात योग्य नियोजन करण्यात महापालिका सातत्याने अपयशी ठरत आहे,” असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
हिवाळ्यातच नागरिकांना टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ
जुनी व नवी सांगवी तसेच पिंपळे गुरव परिसरातील रहिवाशांनाही या काळात टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. काही भागात अत्यंत कमी दाबाने पाणी येत असल्याने नोकरदार वर्गाला पाणी मिळण्याच्या बदलत्या वेळापत्रकाचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक सोसायट्यांनी पाण्याचे टँकर मागवले तर अनेक नागरिकांनी पिण्याचे पाणी विकत घेण्याचा पर्याय निवडला आहे.
धरणात पाणी असूनही तुटवडा; नागरिक संतप्त
धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा असताना आणि हिवाळ्याची सुरुवात असूनही शहरात पाणीपुरवठ्याच्या समस्या निर्माण झाल्याने नागरिकांत नाराजी वाढली आहे. काही ठिकाणी दूषित पाणी येत असल्याच्या तक्रारीही पुढे येत आहेत. “कर आणि पाणीपट्टी नियमित आकारली जाते, मग पाणी मात्र वेळेवर आणि पुरेसे का मिळत नाही?” असा जोरदार सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.