भीमा नदीपात्रात 40 हजार क्युसेकने विसर्ग; बंधाऱ्यासह लहान-मोठ्या पुलावरील वाहतूक बंद
टेंभुर्णी : राज्यामध्ये तुफान पावसाने हजेरी लावली आहे. महाराष्ट्रामध्ये 12 दिवसांपूर्वी मान्सून दाखल झाला आहे. याचा सर्वात मोठा फटका हा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीला बसला आहे. बारामती आणि सोलापूरमध्ये झालेल्या तुफान पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. उजनी धरण परिसरात काही दिवसांपासून पावसाने हजेरी लावली असून दि.२२ तारखेपासून उजनीच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. रविवारी (दि.25) दिवसभर पुणे जिल्ह्यातील उजनीच्या लोकल भागामध्ये ढगफुटीसदृष्य अवकाळी पाऊस बरसला. रविवारी सकाळी सहा ते सोमवारी सकाळी सहा या चोवीस तासात उजनीत दौंडमधून 18 हजार क्युसेस विसर्गाने पाणी जमा होण्यास सुरुवात होऊन पाणीसाठ्यात 05 टीएमसीने वाढ होत एकूण 59.52 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. तर चार दिवसांत 8 टीएमसी ने पाणीसाठा वाढला आहे. येत्या दोन दिवसांत उजनी मायनसमधून प्लसमध्ये येण्याची आशा आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
शनिवारी दि.२४ पासून उजनी धरण परिसरातील दौंड भिगवण,पळसदेव,पाटस,कुरकुंभ यवत,रावणगाव, या परिसरात चोवीस तासांत अंदाजे दीडशे ते दोनशे मीलीमीटर पाऊस पडला. संततधार पाऊस चालूच असल्याने ओढे,नाले आणि तलाव दुधडी भरभरून वाहू लागले आहेत. उजनी धरणामध्ये सर्व ठिकाणाहून पाणी जमा होत असून 13 तासात जवळपास 05 टीएमसी ने पाणी वाढले आहे. तर दि २१ रोजी ५१.३६ टीएमसी पाणीसाठा होता त्यांमध्ये सोमवारी सकाळी वाढ होऊन ५९.५२ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.
काल रात्री दौंडचा विसर्ग 10 हजार क्युसेस होता. इतर ठिकाणावरून जमा होणारे पाणी मिसळून रात्रीत 18 हजार क्युसेस होऊन जवळपास दोन ते तीन टीएमसी पाणी वाढले आहे. तसेच निरा व भीमा नदीच्या खोऱ्यात जोरदार पाऊस बरसत आहे. यामुळे निरा नदीतून लाटे येथे २६,५२५ क्युसेक्सने नदीपात्रात सुरू असून भीमा व नीरा नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा दिला आहे.
उजनी पाणी पातळीत वाढ
उजनी धरणामध्ये आज (दि.२६) रोजी सकाळी 06 वाजता एकूण पाणीसाठा हा ५९.५२टीएमसी आहे. यामधील उपयुक्त पाणीसाठा -७.६८ टीएमसी आहे. तर टक्केवारी – ७.७८ टक्के आहे. उजनी धरणामध्ये दौंडमधून येणारा विसर्ग १८५०६ क्युसेस आहे. यामुळे उजनी धरणाची पातळी वाढली आहे.
राज्यातील हवामान विभागाचा अंदाज जाणून घेण्यासाठी क्लिक करा
मुंबईमधील प्रादेशिक हवामान विभागाने मुंबईसह राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये अलर्ट दिला आहे. सोमवारी (दि.26) राज्यातील सहा जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. प्रादेशिक हवामान विभागाने मुंबई, नवी मुंबई शहर, रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट दिला आहे. त्याचबरोबर ठाणे आणि पालघरला ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच पुण्यामध्ये सकाळपासून पावसाने थोडी उघडीप घेतली आहे. तसेच ऊन पडल्यामुळे पुणेकरांना दिलासा मिळाला आहे.