खासदार संजय राऊत यांनी पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवरुन टीका केली आहे (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : केंद्र सरकारकडून तयार करण्यात आलेले सर्वपक्षीय शिष्टमंडळ हे इतर देशांमधून जाऊन भारताची भूमिका स्पष्ट करत आहेत. यासाठी खासदार परदेशी दौरे करुन यशस्वीरित्या बोलणी करुन परत येत आहेत. मात्र यावरुन शिवसेना ठाकरे गट नाराज असल्याचे चित्र दिसत आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या अनेक निर्णयावर आक्षेप घेत टीका केली आहे. तसेच संजय राऊत यांनी राज-उद्धव यांच्या युतीवर देखील भाष्य केले आहे.
खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. खासदार राऊत म्हणाले की, नीती आयोगाच्या बैठका झाल्या. स्वतः प्रधानमंत्री नरेंद्र मोदी टीम इंडिया म्हणून काम करत आहेत का तर नाहीत, ते भारताला विश्वासात घेत नाहीत. भाजपशासित राज्य आहे त्यांच्या मुख्यमंत्र्यांना ते विश्वासात घेत नाहीत. प्रमुख विरोधी पक्षनेत्यांना विश्वासात घेत नाहीत. त्यांनी पहलगाम हल्ल्याचे राजकारण सुरू केले. नीती आयोगाच्या बैठकीत सुद्धा ऑपरेशन सिंदूर बद्दल चर्चा होते. आम्हाला म्हणता पहलगाम हल्ल्याचे राजकारण करू नये. प्रधानमंत्री यांचे लष्करी गणवेशातील होर्डिंग फोटो असा राजकारण करून शहीद झालेल्या जवानांचा अपमान करत आहेत. ऑपरेशन सिंदूर भाजपासाठी केलं आहे का? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, सर्व पक्ष नेत्यांना घेऊन यात्रा काढायला हे काय भाजपसाठी केले आहे का? हल्ल्यातील जे अतिरेकी गायब झाले त्यांचा शोध लावला नाही. अमेरिकन प्रेसिडेंटच्या दबावाखाली युद्ध थांबवले. ऑपरेशन सिंदूर हा जर अजंडा असेल याचा अर्थ पुलवामामध्ये आम्हाला जो संशय येतोय तेही आरोपी सापडले नाही. त्याचे राजकारण केले आणि आता पहलगाममध्ये देखील जे घडलं आहे त्याच्यामागे देखील राजकारण किंवा कारस्थान आहे असा संशय येईल. राजकारणासाठी हे सर्व घडवताय का? असे स्पष्ट संकेत प्रधानमंत्री यांच्या दृष्टीतून दिसत आहेत. ऑपरेशन सिंदूर सैनिकांचं ऑपरेशन आहे. त्याचं क्रेडिट देशातील कोणत्याही पंतप्रधानाने आतापर्यंत घेतलेलं नाही. तुम्ही तिन्ही सेनादलांना या युद्धातून मागे घेतलं, युद्ध जिंकत असताना त्यांना गुडघे टेकायला लावलं, असा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
पुढे संजय राऊत म्हणाले की, तुमच्या घरातील महिलांना पाठवा, तुमच्या घरात अतिरेकी घुसले तर ते प्रतिकार करणार याचा खुलासा करा. तुम्ही आमच्या सव्वीस महिलांच्या कुंकवाचा अपमान करता. जे हे बोलत आहेत त्यांनी गृहमंत्री अमित शाह यांचा राजीनामा मागायला हवा होता. त्यांच्या अपयशाने ही वेळ आली आहे. ज्या पद्धतीने त्यांनी ऑपरेशन सिंदूर आणि लष्करी कारवाईचं क्रेडिट घेतलेलं आहे ते स्वतःलाच बोलत आहेत. आमच्या 26 महिलांच्या पतीचे प्राण वाचवू शकले नाही, त्यांच्या नावाने यात्रा काढून निर्लज्जपणा करत आहात. सिंदूर पुसले गेले त्याचं राजकारण करायचं आहे, अशी घणाघाती टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
लवकरच पालिकेच्या निवडणूका होणार असल्यामुळे राजकारण तापले आहे. दरम्यान, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या चर्चा रंगल्या आहेत. याबाबत खासदार राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी स्वतः सांगितलेलं आहे, किरकोळ विषय आहे ते आम्ही संपवू, मतभेद संपवून टाकू. त्यानंतर आदित्य ठाकरे हे देखील म्हणतात की, आम्ही तयार आहोत. महाराष्ट्र आणि मराठी माणूस संकटात आहे. प्रत्यक्ष क्षेत्रातील मराठी माणसाला वाटलं पाहिजे की, मराठी माणूस एकत्र यायला पाहिजे. आम्ही भूतकाळात डोकावत नाहीत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा भूतकाळ आमच्या सोबतचा चांगला नव्हता. पण आम्ही सरकार चालवले. भविष्याच्या विचाराने आम्ही एकत्र आहोत. राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षाने भूतकाळातून बाहेर येणं आणि भविष्याचा विचार करणं गरजेचे आहे. आम्ही त्या दृष्टिकोनातून पाऊल टाकलं आहे, असे सूचक विधान खासदार संजय राऊत यांनी केले आहे.