'...मग काय साखरपुडे करा, लग्न करा'; कर्जमाफीच्या मुद्यावरून कृषिमंत्र्यांचे विधान
नाशिक : राज्यात वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. त्यात अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या अवकाळीमुळे राज्यातील विविध भागात पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. या नुकसानीची कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी आक्षेपार्ह विधान केले होते. यावर विरोधकांकडून जोरदार हल्लाबोल केला जात आहे.
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी अवकाळीमुळे शेतीच्या नुकसानीच्या पाहणी केली. यावेळी ते म्हणाले, ‘कर्जमाफी मिळाल्यानंतर जे पैसे येतात त्या पैशांचं तुम्ही काय करता? शेतीमध्ये गुंतवणूक आहे का एक रुपयाची तरी? सरकार शेतीमध्ये गुंतवणुकीला पैसे देणार आता तुम्हाला. शेतकरी 5 ते 10 वर्षे वाट पाहतात, तोपर्यंत कर्ज भरतचं नाही. सरकार सिंचनासाठी, पाईपलाईनसाठी पैसे, पिकासाठी पैसे, शेततळ्याला पैसे देणार आहे. भांडवली गुंतवणूक सरकार करतं, शेतकरी करतो का? शेतकरी म्हणतो विम्याचे पैसे हवेत, ह्याचे-त्याचे पैसे हवेत, मग साखरपुडे करा, लग्न करा.’
दरम्यान, 1995 साली कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. कोकाटे हे मागील अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. याप्रकरणी नाशिक जिल्हा न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा देखील सुनावली आहे. या प्रकरणामुळे त्यांचं मंत्रिपद जाणार की काय? अशा चर्चा सुरू होत्या. तर कृषीमंत्री असतानाही माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांबाबत आक्षेपार्ह विधान केले.
कर्जमाफीच्या पैशांचं तुम्ही काय करता?
‘कर्जमाफी मिळाल्यानंतर जे पैसे येतात त्या पैशांचं तुम्ही काय करता? शेतीमध्ये गुंतवणूक आहे का एक रुपयाची तरी? सरकार शेतीमध्ये गुंतवणुकीला पैसे देणार आता तुम्हाला. शेतकरी 5 ते 10 वर्षे वाट पाहतात, तोपर्यंत कर्ज भरतचं नाही. सरकार सिंचनासाठी, पाईपलाइनसाठी पैसे, पिकासाठी पैसे, शेततळ्याला पैसे देणार आहे. भांडवली गुंतवणूक सरकार करतं, शेतकरी करतो का? शेतकरी म्हणतो विम्याचे पैसे हवेत, ह्याचे-त्याचे पैसे हवेत, मग साखरपुडे करा, लग्न करा.’
नाशिकमधील माडसांगवीत कृषिमंत्र्यांची पाहणी
शुक्रवारी सायंकाळी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे नाशिकमधील माडसांगवी या गावी आले होते. गावात अवकाळीमुळे नुकसान झालेल्या पिकांच्या पाहणीसाठी ते माडसांगवी या गावात आले होते. अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहाणी करताना कृषीमंत्र्यांनी नुकसानीचा आढावा घेतला. पाहाणीदरम्यान, तिथे एका शेतकऱ्याने कोकाटे यांना कर्जमाफी संदर्भात प्रश्न विचारला.
संजय राऊत काय म्हणाले?
माणिकराव कोकाटे म्हणजे मला वाटतं कृषी क्षेत्रातले कुणाल कामरा झाले आहेत. माणिकराव कोकाटे अनेक वर्षांपासून राजकारणात आहेत. त्यांनी अशा प्रकारची विधाने करू नयेत. शेतकऱ्यांना दुखवणारी विधाने केली नाही पाहिजे. अजित पवार यांनी प्रफुल पटेल आणि माणिकराव कोकाटे यांच्यासारख्या लोकांना लगाम नाही घातला तर त्यांचं काही खरं नाही, असेही खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.