
मुंबई : नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा रविवारी (9 जून) रोजी पार पडला. यावेळी एनडीए आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी उपस्थिती लावली होती. दिल्लीतील राष्ट्रपती भवन येथे पार पडलेल्या या दिमाखदार सोहळ्यामध्ये नरेंद्र मोदी यांच्यासह 71 मंत्र्यांनी शपथ घेतली. नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान झाले. यावेळी त्यांना पाठबळ देणारे सर्व घटक शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. यामध्ये अजित पवार व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते. मात्र राज्यामध्ये भाजपला बिनशर्त पाठिंबा दिलेल्या राज ठाकरे यांना मात्र शपथविधी सोहळ्याचे आमंत्रण देण्यात आले नाही. यावर आता राजकारण रंगले असून याबाबत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
गरज असल्यावर उंबरठे झिजवायचे अन् काम झाल्यावर दार लावायचं
महायुतीच्या उमेदवारासाठी मनसे कार्यकर्त्यांनी प्रचार केला. मात्र मनसे प्रमुख राज ठाकरे यांना मात्र शपथविधी सोहळ्याचे आमंत्रण देण्यात आले नाही. यावरुन मनसे नेते प्रकाश महाजन यांनी नाराजी व्यक्त केली. “मनसेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर लोकसभा निवडणुकीत आमचे कार्यकर्ते राबले. त्यामुळे दिल्लीतील एनडीए सरकारच्या शपथविधीसाठी आम्हाला आमंत्रण मिळालं असतं तर आम्हाला आनंद झाला असता. मनसे पक्ष हा एनडीएमधील घटकपक्ष नाही. त्यामुळे दिल्लीतील एनडीएच्या समन्वय बैठकीला आम्हाला बोलावणं अपेक्षित नव्हतं. मात्र, एनडीए सरकारच्या शपथविधीला मनसेला निमंत्रण देण्यात आले होते का, हे सांगणे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कठीण आहे. आम्ही बिनशर्त पाठिंबा देऊन आमचे कार्यकर्ते महायुतीसाठी राबत होते. मोठं अपयश आल्याने महायुतीचे नेते आमंत्रण देण्यात विसरले असावेत. आपल्याच लोकांना आमंत्रण देण्यासाठी विसरतात. मैत्री जपणारी पिढी आता भाजपमध्ये संपलेली आहे. गरज असल्यावर उंबरठे झिजवायचे आणि काम झाल्यावर दार लावायचं. याचे परिणाम त्यांनी लोकसभा निवडणुकीत पाहिले आहेत. आमची त्यांच्यासोबत युती नव्हती. आमचा फक्त नरेंद्र मोदी यांना पाठिंबा होता,” अशा शब्दांत प्रकाश महाजन यांनी नाराजी व्यक्त केली.
सुधीर मुनगंटीवार स्पष्टीकरण
यावर सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टीकरण दिले. माध्यमांशी संवाद साधताना मुनगंटीवार म्हणाले, “यासंदर्भात माझं बाळा नांदगावर यांच्याशी बोलणं झालं. त्यांनी सांगितलं की त्यांना या सोहळ्याचं निमंत्रण नव्हतं. मी नक्कीच वरिष्ठ नेत्यांशी याबाबत चर्चा करेन. कदाचित घाईगडबडीत त्यांना निमंत्रण द्यायचं राहिलं असेल. मात्र, यामागे दुसरी कोणतीही भावना नाही. शपथविधी सोहळ्याला येणाऱ्या पाहुण्यांची यादी अधिकारी राजशिष्टाचारानुसार करतात, त्यामुळे कधी कधी जवळच्या व्यक्तींना निमंत्रण द्यायचं राहून जातं. मात्र, राज ठाकरे यांना निमंत्रण नसेल, तर त्याची नोंद केंद्रीय नेतृत्वाने घेतली पाहिजे”, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.