
शिरोली / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांनी विविध उपक्रमशीलता जपत, काळाची पावले ओळखत तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर आपल्या अध्यापनात करत समाजात जिल्हा परिषदेच्या शाळाविषयी सन्मान प्रस्तापित केला आहे. महिला शिक्षिका अत्यंत कष्टाने जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देत आहेत. त्यांचा हा सन्मान म्हणजे संपूर्ण नारीशक्तीचा सन्मान आहे, असे प्रतिपादन लेखिका अभिनेत्री अंजली अत्रे यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे म्हणाल्या, कोल्हापूर जिल्हा परिषद शैक्षणिक गुणवत्तेमध्ये राज्यात अग्रेसर आहे. राज्य प्राथमिक शिक्षक संघ महिला आघाडी यांच्या वतीने आयोजित क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार वितरण कार्यक्रमात त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शनी मोरे व बालसाहित्यक, अभिनेत्री अंजली अत्रे उपस्थित होत्या.
उपमुख्यकार्यकारी अधिकारी प्रियदर्शनी मोरे, जिल्हाध्यक्ष लक्ष्मी पाटील, जिल्हाध्यक्षा लक्ष्मी पाटील , रवीकुमार पाटील, रोहिणी लोकरे, राज्यसंपर्क प्रमुख एस. व्ही. पाटील अभिनेत्री अंजली अत्रे यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास राज्य उपाध्यक्ष आनंदराव जाधव यांच्यासह महिला शिक्षिका व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.