यवतमाळ : आमदारांच्या शपथविधीनंतर राज्याच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या घोषणेची प्रतीक्षा आहे. राज्यातील मंत्रिपदांचा फार्म्युला ठरलेला असला तरी त्याची अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे निवडणूक जिंकल्यानंतर मुंबईमध्ये असलेल्या जिल्ह्यातील सर्वच नवनिर्वाचित उमेदवारांसह मंत्रिपदासाठी इच्छुकांचा मुंबई नगरीतील मुक्काम वाढला आहे.
हेदेखील वाचा : ‘भारत सोडा, अमेरिकाही नाही टिकणार, 4 दिवसांत कोलकाता काबीज करू’ ; बांगलादेशचे रिटायर्ड मेजरचे वक्तव्य
शनिवारपासून (दि.7) विधिमंडळाचे विशेष अधिवेशन सुरू झाले आहे. आमदारकीची शपथ घेतल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. सुमारे तीन दिवसांपर्यंत विशेष अधिवेशन घेण्यात येणार आहे. त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार आहे. त्यामुळे मंत्रिपद मिळवण्यासाठी इच्छुक असलेल्यांचा जिल्ह्यातील आमदारांचा मुंबई दौरा लांबणार आहे. मुंबई येथील विशेष अधिवेशनासाठी यवतमाळ जिल्ह्यातील सातही मतदारसंघातील आमदार मुंबईत आहे.
वणी येथील उबाठाचे संजय देरकर, राळेगाव येथील भाजपचे अशोक उईके, आर्णी येथून भाजपचे राजू तोडसाम, यवतमाळचे काँग्रेसचे बाळासाहेब मांगुळकर, पुसद येथील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे इंद्रनील नाईक, दिग्रस येथील शिवसेना शिंदे गटाचे संजय राठोड, उमरखेड येथील भाजपचे किसन वानखडे हे नवनिर्वाचित उमेदवार शुक्रवारीच मुंबईला पोहोचले.
नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या
मंत्रिपदासाठी इच्छुक असणाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्याशी संपर्क सातत्याने कायम ठेवला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील दोन आमदारांना मंत्रिपदाची शक्यता आहे. त्यापैकी दिग्रसचे राठोड व राळेगावचे उईके यांना लालदिवा मिळण्याची चर्चा राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.
भाजपसह शिवसेना, राष्ट्रवादीला मंत्रिपदं किती?
आमदारांच्या संख्याबळानुसार, भारतीय जनता पक्षाला अधिक मंत्रिपदे मिळणार आहेत. त्यानंतरची मंत्रिपदे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये वाटली जाणार आहेत. त्यामुळे कोणाला किती मंत्रिपदे मिळणार? यासंदर्भातील चर्चा आता अंतिम टप्प्यामध्ये आली आहे. आमदार राठोड व उईके यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याचे संकेत आहे.
अनेक आमदार मुंबईत तळ ठोकून
जिल्ह्यातील अनेक नवनिर्वाचित आमदार सध्या मुंबईमध्ये तळ ठोकून आहेत. ज्यांना मंत्रिपदाबाबत खात्री आहे असे सर्वच नेते निश्चित आहेत. ज्यांना मंत्रिमंडळामध्ये नव्याने एन्ट्री करायची आहे, असे आमदार एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची सातत्याने भेट घेत आहेत.
महायुतीच्या इमेजची घ्यावी लागणार मोठी काळजी
मंत्रिपदावर नाव निश्चित करताना तिन्ही पक्षांना यंदा महायुतीच्या इमेजची मोठी काळजी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे वादग्रस्त नावांवर विचार करताना महायुतीला मोठ्या प्रमाणावर विचार करावा लागणार आहे. नेतेही नाराज व्हायला नको आणि महायुतीची इमेज देखील कायम राहील, असे संतुलन तिन्ही नेत्यांना राखावे लागणार आहे.
हेदेखील वाचा : “इव्हिएमला दोष देऊन अपयश झाकलं जात नाही, तुमचा आदर करतो, मात्र…; बावनकुळेंचा शरद पवारांना खोचक टोला