पावसाळी अधिवेशन सुरु झाले असून मागील दोन-तीन दिवसांपासून सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांमध्ये निधी वाटपावरून जोरदार आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात निधी वाटपावरून खडाजंगी पाहायला मिळत आहे.अशातच आता काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्यात विधानसभेच्या सभागृहात कलगीतुरा रंगला. सभागृहातील खडाजंगीनंतर यशोमती ठाकूर यांनी अजित पवारांवर हल्लाबोल केला. “तुम्ही महाराष्ट्राची घाण करत आहात, हे नक्की”, अशी प्रतिक्रिया यशोमती ठाकूर यांनी दिली.
निधी वाटप करताना कोणताही भेदभाव केला नाही- अजित पवार
खरं तर, विधानसभेत निधी वाटपावरून विरोधकांनी आरोप केल्यानंतर अर्थमंत्री अजित पवार यांनी विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं. “निधी वाटप करताना कोणताही भेदभाव केला नाही. २०१९, २०२० आणि २०२१ या काळात निधीवाटपाबद्दल जे साधारण सूत्र होतं. तेच सूत्र आम्ही पुढे कायम ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामध्ये फारसा काही बदल केला नाही,” असं उत्तर अजित पवारांनी दिलं. अजित पवारांच्या या उत्तरावर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर जोरदार आक्षेप नोंदवला.
यशोमती ठाकूर यांच्या आक्षेपानंतर अजित पवार म्हणाले, “यशोमतीताई, तुम्ही माझ्या भगिनींसारख्या आहात. माझं ऐकून घ्या. माझं ऐकून घेतल्यानंतर तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे. भावाच्या नात्याने तुम्हाला ओवाळणी देतो. काळजी करू नका.” यावर यशोमती ठाकूर म्हणाल्या, “तुम्ही १५ दिवसांतच सावत्र भावासारखं वागायला लागलात.” यानंतर अजित पवार म्हणाले, “तुम्ही चष्मा बदला, सावत्र भावाप्रमाणे माझ्याकडे बघू नका. मी सावत्र बहीण म्हणून तुमच्याकडे बघत नाही.”