गोसेच्या कालव्यात तरुणाचा मृत्यू
पवनी : पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून यापूर्वी अनेकांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. असे असताना आता गोसेखुर्द धरणाच्या कालव्यात बुडून एका तरूणाचा मृत्यू झाला. सत्यपाल नीलकंठ सलामे (वय 26, रा. कोरंभी) असे या तरुणाचे नाव आहे. सत्यपाल सलामे याच्या मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे.
गोसेखुर्द धरणाच्या कालव्यात त्याचा बुडून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि. 24) उघडकीस आली. सत्यपाल हा शेळीपालन व मजुरीचेही काम करत होता. बुधवारी (दि. 23) तो सकाळी दहाच्या सुमारास आपल्या आईला शेळ्यांसाठी चारा आणायला जातो, असे सांगून सायकलने घराबाहेर पडला होता. मात्र, संध्याकाळी 4 वाजेपर्यंत घरी परतला नाही. कुटुंबीयांनी नातेवाईकांकडे, गावात व परिसरात शोधाशोध केली. परंतु त्याचा काही ठावठिकाणा लागला नाही. अखेर पवनी पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली.
हेदेखील वाचा : आंघोळीसाठी पाण्यात उतरलेल्या तरुणाचा जबलपूरच्या नदीत बुडून मृत्यू; पर्यटनच बेतलं जीवावर
दरम्यान, गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास पोलिसांच्या मदतीने सुरू असलेल्या शोधमोहीमेदरम्यान सीमा गेट कंपनीजवळील कालव्यात सत्यपालचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह बाहेर काढला. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
सत्यपाल अत्यंत शांत आणि कष्टाळू
सत्यपाल हा कष्टाळू व शांत स्वभावाचा तरुण होता. त्याच्या अचानक झालेल्या मृत्यूने कोरंभी गाव व परिसरात शोककळा पसरली आहे. नातेवाईक व ग्रामस्थ हळहळ व्यक्त करत असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
आंघोळीदरम्यान तरूणाचा बुडून मृत्यू
दुसऱ्या एका घटनेत, चंद्रपूर येथून पर्यटकांना घेऊन जाणारी एक पर्यटक बस भेडाघाटला पोहोचली. भेडाघाटच्या सरस्वती घाटात आंघोळ करताना एका पर्यटकाचा नदीत बुडून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सकाळच्या सुमारास घडली. बऱ्याच प्रयत्नांनंतर त्याला नदीतून बाहेर काढण्यात आले. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.
हेदेखील वाचा : Raigad News : माणगाव पोलिसांची मोठी कारवाई ; ‘ट्युबक्राफ्ट’ कंपनीतील लाखो रुपयांची मशिनरी चोरणारी टोळी जेरबंद!