अलिबाग : माणगाव पोलिसांनी ‘ट्युबक्राफ्ट प्रेसिजन प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीतून सुमारे 33 लाख 10 हजार रुपयांची मशिनरी आणि इतर साहित्य चोरून नेणाऱ्या सहा आरोपींच्या टोळीला अटक केली आहे. ही कारवाई गोपनीय माहिती आणि तांत्रिक कौशल्याच्या आधारे करण्यात आली, अशी माहिती माणगाव पोलिसांनी दिली आहे.
घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की, माणगाव पोलीस ठाण्यात 22 फेब्रुवारी 2025 रोजी भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 331 (1) (2), 305 (अ), 324 (4) (5), 3 (5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्यांनी कंपनीचे शटर तोडून आत प्रवेश करत सुमारे 33 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचे पथक तयार करण्यात आले होते. तांत्रिक कौशल्य आणि वैज्ञानिक तपास पद्धतींचा वापर करून आरोपींची नावे निष्पन्न करण्यात आली.
या गुन्ह्यातील मुख्य आरोपी मंगेश रविंद्र पवार (वय 25, रा. पाथरशेत आदिवासी, ता. रोहा, जि. रायगड) याला अटक करण्यात आली. त्याच्याकडे सखोल चौकशी केल्यानंतर इतर साथीदारांची नावे समोर आली. त्यात विकास दत्ता पवार (रा. दिघेवाडी, पो. नांदगाव, ता. सुधागड, जि. रायगड), समीर भिम पवार (रा. काजुवाडी, पो. नांदगाव, ता. सुधागड, जि. रायगड), दिनेश उर्फ बबलू बबन घोगरेकर (रा. पाथरशेत आदिवासीवाडी, पो. जामगाव, ता. रोहा, जि. रायगड), आकाश हरीश्चंद्र पवार (रा. पाथरशेत आदिवासीवाडी, पो. जामगाव, ता. रोहा, जि. रायगड) आणि चंद्रकांत इक्का जाधव (वय 35, रा. पाथरशेत आदिवासीवाडी, ता. माणगाव, जि. रायगड) यांचा समावेश आहे.
या आरोपींनी संगनमत करून डिसेंबर 2024 ते फेब्रुवारी 2025 या तीन महिन्यांच्या कालावधीत कंपनीचे शटर उचकटून आत प्रवेश केला आणि कंपनीतील महागडे कॉपर वायर, अल्युमिनियम वायर, डाय, वेल्डिंग मशीन, टूलिंग मशीन आणि इतर साहित्य चोरून नेले.या आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी रोहा, कोलाड, पाली, महाड परिसरात दोन पथके तयार करून शोधमोहीम राबवली. अखेर, 23 जुलै 2025 रोजी सर्व सहा आरोपींना अटक करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी एकूण 37 लाख 90 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
आरोपींवरील दाखल गुन्हे:
आकाश हरीश्चंद्र पवार:
माणगाव पोलीस ठाणे: गुन्हा रजि. नं. 283/2023 भा.द.वि.सं. कलम 324, 141, 143, 147, 149, 323, 504 प्रमाणे.
माणगाव पोलीस ठाणे: गुन्हा रजि. नं. 358/2022 भा.द.वि.सं. कलम 379, 34 प्रमाणे (रस्त्यावरील कामाचे स्टील चोरी).
जे.एम.एफ.सी रोहा: गुन्हा रजि. नं. 69/2024 कौटुंबिक संरक्षण महिला संरक्षण अधिनियम 2005 चे कलम 18, 19, 20, 21, 22, 23, 12 प्रमाणे.
मंगेश रविंद्र पवार:
माणगाव पोलीस ठाणे: गुन्हा रजि. नं. 37/2021 महा. वनसंरक्षण कायदा कलम 31, 82 (1) (2).
दिनेश उर्फ बबलू बबन घोगरेकर:
माणगाव पोलीस ठाणे: गुन्हा रजि. नं. 283/2023 भा.द.वि.सं. कलम 324, 141, 143, 147, 149, 323, 504 प्रमाणे
ही यशस्वी कामगिरी रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे, उपविभागीय पोलीस अधिकारी माणगाव विभाग पुष्कराज सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली, माणगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक निवृत्ती बोरहाडे, सहायक पोलीस निरीक्षक भैरु जाधव, सहायक पोलीस निरीक्षक बेलदार, पोलीस उपनिरीक्षक सुरेश घुगे, तसेच पोहवा फडताडे, पोहवा घोडके, पोशी शिर्के, पोशी मुंडे, पोशी दहिफळे, पोशी पवार यांनी केली आहे.
या अटकेमुळे परिसरातील चोरीच्या घटनांना आळा बसण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे.