भाईंदर / विजय काते :- मुसळधार पावसामुळे काही निसर्गरम्य ठिकाणी शासनाने पर्यटकांना जाण्यास बंदी घातली आहे. गडकोट किंवा पाण्याच्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अभाव असल्याने दिसून आले त्याठिकाणचे पर्यटन काही काळाकरीता बंद ठेवण्यात आले आहे. पावसाळी सहलीसाठी अनेकजण पाण्याच्या ठिकाणी जाणं पसंत करतात. मीरा भाईंदरमधील तीन तरुण पावसाचा आनंद घेण्यासाठी काशिमीराच्या चेना नदीकाठी गेले होते. या तिघांना पाण्यात जाण्याचा मोह आवरता आला नाही. पाण्याचा अंदाज न आल्याने यातील एका तरुणाचा दुदैवी मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.
काशिमीरा मधील चेना नदी परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या तीन मित्रांपैकी एकाचा पोहत असताना बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी (२२ जून) दुपारी सुमारास घडली. ही घटना जवळपास दुपारी ३ वाजता घडली असून मृत युवक अंधेरी येथील रहिवासी होता, तर त्याचे दोघे मित्र भाईंदर येथील असल्याची माहिती आहे.मिळालेल्या माहितीनुसार, तिघे मित्र चेना नदीच्या परिसरात पाहणीसाठी गेले होते. त्यापैकी एकाने पोहण्यासाठी नदीत उतरण्याचा प्रयत्न केला असता तो खोल पाण्यात गेला आणि बुडाला. त्याच्या मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.
घटनेची माहिती मिळताच काशीगाव पोलीस ठाण्याचे पोलीस पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला आहे.पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा धोकादायक आणि खोल पाण्याच्या ठिकाणी विनापरवागी पोहण्याचा प्रयत्न करू नये.
काही दिवसांपूर्वीच पर्यटकांच्या सुरक्षेचा विचार करत शासनाने सातारा जिल्ह्यातील तब्बल 20 पर्यटन स्थळांवर बंदी घातली आहे. ठोसेघर धबधबा, केळवली-सांडवली धबधबा,वजराई धबधबा, कास पठार,एकीव धबधबा,कास तलाव,बामणोली, पंचकुंड धबधबा,सडावाघापूर उलटा धबधबा, ऊरुल घाट शिव मंदिर धबधबा, रुद्रेश्वर देवालय धबधबा, ओझर्डे धबधबा, घाटमाथा धबधबा, लिंगमळा धबधबा,महाबळेश्वर ,पाचगणी या आणि अशा एकूण वीस ठिकाणांना 20 जून ते 20 ऑगस्ट पर्यंत पर्यटकांसाठी बंदी घातल्यात आली आहे. पावसाळ्यात पाण्याच्या ठिकाणी जाताना पावसाळी सहली आनंद घेत असताना पर्यटकांनी आपल्या सुरक्षेचा देखील विचार करावा असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.