Yugendra Pawar
बारामती : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी बारामती मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांना उमेदवारी देण्यासंदर्भातील अप्रत्यक्ष स्पष्ट संकेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोलताना दिले.
शरद पवारांचा बारामतीमधील गावांचा दौरा
बारामती तालुक्यातील सांगवी व माळेगाव येथील कार्यक्रमांमध्ये शरद पवार यांनी अप्रत्यक्षरीत्या हे संकेत दिले. लोकसभा निवडणूक निकालानंतर शरद पवार सलग तीन दिवस बारामती तालुक्यातील विविध महत्त्वाच्या गावांमधील दौऱ्यात आहेत. सांगवी या ठिकाणी ग्रामस्थांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी पवार म्हणाले, निवडणुकीत काही लोकांचा विरोध खूप झाला, विरोध झाला, हे विसरून जायचं. लक्षात ठेवायचं नाही. सुडाचं राजकारण आपण कधी करत नाही.
तरुण पिढीच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सोडवणे गरजेचे
लोकसभा निवडणुकीत गावच्या नेत्यांचं दुकान कधी चाललं नाही, मात्र सामान्य माणसं, कष्टकरी, शेतकरी, कामगार या लोकांचं दुकान जोरात चाललं, त्यामुळं नवी तरुण पिढी पुढं आली. त्यामुळं या तरुण पिढीच्या माध्यमातून गावातील लोकांचे प्रश्न कसे सुटतील, याकडे लक्ष देणं , ही आम्हा लोकांची जबाबदारी आहे.
संभाव्य उमेदवारी संदर्भात अप्रत्यक्ष संकेत
या तरुण पिढीच्या माध्यमातून ज्यांनी पुढाकार घेतला, त्यांच्या पाठीशी राहून त्यांच्याकडून सर्व गोष्टी करून घेण्याची जबाबदारी आम्हा लोकांची राहील, असे आश्वासन पवार यांनी यावेळी देत तू गेंद्र पवार यांच्या विधानसभा निवडणुकीच्या संभाव्य उमेदवारी संदर्भात अप्रत्यक्ष संकेत दिले. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी टाळ्याच्या गजरात शरद पवार यांच्या या वक्तव्याचे स्वागत केले.
तुमच्या मनातील उमेदवार नक्की देणार
याच दिवशी माळेगाव या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात बारामती विधानसभा मतदारसंघांमध्ये युगेंद्र पवार यांना उमेदवारी द्यावी अशी घोषणाबाजी उपस्थित कार्यकर्त्यांनी केली. यावेळी शरद पवार यांनी उपस्थितांना उद्देशून तुमच्या मनातील उमेदवार नक्की मी देईल, असे आश्वासन दिल्याने उपस्थित त्यांनी टाळ्याच्या कडकडाटांत स्वागत केले.