‘आई कुठे काय करते’ मधील अनिरुद्ध देशमुख पुन्हा येतोय, नव्या मालिकेतून साकारणार रुबाबदार राजकीय नेत्याची भूमिका
स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ (aai kuthe kay karte) मालिकेला तब्बल ५ वर्षे प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं. या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. मालिका संपली असली तरीही मालिकेतील कलाकारांची लोकप्रियता जराही कमी झालेली नाही. मालिकेमधील अनिरुद्ध हे लोकप्रिय पात्र अभिनेते मिलिंद गवळीने (milind gawali) साकारले होते. आता लवकरच ‘आई कुठे काय करते’ मालिकेनंतर अभिनेता मिलिंद गवळी प्रेक्षकांच्या भेटीला ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ (lagnanantar hoilch prem) मालिकेतून येणार आहेत.
रणवीर अलाहबादियाच्या अडचणींमध्ये वाढ, प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्रीच्या पोस्टने वेधले लक्ष!
‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेतून अभिनेता मिलिंद गवळी आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. मालिकेमध्ये अभिनेता माजी समाजकल्याण मंत्री यशवंतराव भोसलेंच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. मालिकेत सध्या पार्थ-नंदिनीच्या लग्नाची धामधूम सुरु आहे. या धामधुमीत यशवंतराव भोंसलेंच्या एण्ट्रीने कथानकात नवा ट्विस्ट येणार आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच ‘आई कुठे काय करते’ मालिकेची मुख्य नायिका अरुंधती म्हणजेच मधुराणी प्रभुलकर ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ या मालिकेत झळकली होती. आता मधुराणी पाठोपाठ अभिनेता मिलिंद गवळीही ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या लोकप्रिय मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या भूमिकेविषयी सांगताना मिलिंद गवळी म्हणाले, “जवळपास तीन महिन्यांनंतर पुन्हा एकदा सेटवरचं वातावरण अनुभवतोय. अनिरुद्ध या पात्रावर प्रेक्षकांनी मनापासून प्रेम केलं. आजही प्रेक्षक या पात्राला विसरलेले नाहीत. लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेतली भूमिका खूप वेगळी आहे. माजी समाजकल्याण मंत्र्याची भूमिका मी साकारत आहे. यशवंतराव भोसलेच्या येण्याने मालिकेत नेमका कोणता धमाका होणार हे प्रेक्षकांना लवकरच कळेल. मी सुद्धा हे पात्र साकारण्यासाठी प्रचंड उत्सुक आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेचे निर्माते शशांक सोळंकी आणि मी एका कॉलेजमध्ये शिकलो. कॉलेजपासूनची ही मैत्री आजपर्यंत घट्ट आहे. जवळच्या मित्राच्या मालिकेत ही खास भूमिका साकारायला मिळतेय याचा आनंद वेगळा आहे. सोबतच स्टार प्रवाहसोबत एक वेगळं जिव्हाळ्याचं नातं आहे. त्यामुळे ही भूमिका खूपच स्पेशल आहे.” तेव्हा पाहायला विसरु नका लग्नानंतर होईलच प्रेम सायंकाळी ७.०० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.