हातात सुरा अन् दारूची बॉटल अन् अंगावर जखमा, टायगर श्रॉफचा Baaghi 4 मधला रक्ताने माखलेला लूक पाहिलात का ?
२०१६ मध्ये रिलीज झालेल्या ‘बाघी’ चित्रपटाचा चौथा भाग रिलीज होणार आहे. चित्रपटातील लोकप्रिय फ्रेंचायझीमध्ये ‘बाघी’ चित्रपटाचाही समावेश होतो. काही तासांपूर्वीच अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत चाहत्यांसोबत ‘बाघी ४’ची पहिली झलक शेअर केली आहे. ‘बाघी’च्या तिनही भागांना प्रेक्षकांनी दमदार प्रतिसाद दिल्यानंतर चाहत्यांना आता चौथ्या भागाची झलक पाहायला मिळणार आहे. ‘बाघी’चा चौथा भाग पुढच्या वर्षी म्हणजेच २०२५ मध्ये रिलीज होणार आहे.
हे देखील वाचा- बिग बॉसच्या घरामध्ये सातव्या आठवड्यात नॉमिनेट झालेले स्पर्धक!
कायमच अफलातून ॲक्शन, अभिनय आणि आपल्या डान्स शैलीसाठी चर्चेत राहणारा टायगर श्रॉफ आता चाहत्यांचं मनोरंजन करायला सज्ज झाला आहे. अभिनेता टायगर श्रॉफ शेवटचा ‘सिंघम अगेन’ चित्रपटात दिसला होता. या चित्रपटामध्ये त्याने पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. चित्रपटाला दिलासादायक यश मिळत असून आता अभिनेता आगामी चित्रपटासाठी सज्ज झाला आहे. काही तासांपूर्वी इन्स्टाग्रामवर अभिनेत्याने ‘बाघी ४’चा पोस्टर शेअर करत रिलीज डेट जाहीर केली आहे.
‘बाघी ४’च्या शेअर केलेल्या पोस्टरमध्ये, टायगर श्रॉफ एका खतरनाक लूकमध्ये पाहायला मिळत आहे. पोस्टर शेअर करताना कॅप्शन दिले की, “एक खोल भावना, एक रक्तरंजित मिशन. यावेळी तो तसा नाही. साजीद नाडियाडवालाचा ‘बाघी ४’…” हा चित्रपट पुढच्या वर्षी ५ सप्टेंबर २०२५ मध्ये रिलीज होणार आहे. शेअर केलेल्या पोस्टरमध्ये टायगर एका टॉयलेट सीटवर बसलेला दिसत आहे. त्याच्या एका हातात रक्ताने माखलेला सुरा दिसतोय. तर त्याच्या आजूबाजूला रक्ताचे सडे आणि त्यात टायगरने मारलेली माणसं पडलेली दिसत आहेत. तर, टायगरच्या दुसऱ्या हातात दारूची बाटली आणि तोंडात बिडी दिसत आहे. पोस्टरमध्ये अभिनेता हुबेहुब वडील जॅकी श्रॉफसारखाच दिसत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, विलेपार्ले येथील गोल्डन टोबॅको प्लांटमध्ये रविवारी 17 नोव्हेंबरपासून चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात झाली आहे.
हे देखील वाचा- मुरलेल्या प्रेमाचा गोडवा घेऊन येणार ‘गुलकंद’, चित्रपटात हास्यजत्रेची टीम अवतरणार
२०१६ मध्ये रिलीज झालेल्या ‘बाघी’ चित्रपटाचा हा चौथा पार्ट आहे. पहिल्या चित्रपटामध्ये टायगरसोबत श्रद्धा कपूरने स्क्रिन शेअर केली होती. पहिल्या भागाचे दिग्दर्शक साबीर खान होते. त्यानंतर २०१८ मध्ये ‘बाघी २’ रिलीज झाला. त्याचे दिग्दर्शन अहमद खानने केले होते. दुसऱ्या भागात टायगरने दिशा पटानीसोबत स्क्रिन शेअर केली होती. त्यानंतर २०२० मध्ये ‘बाघी’चा तिसरा भागही आला. त्याचेही दिग्दर्शन अहमद खान यांनीच केले होते. या चित्रपटात श्रद्धा कपूर आणि टायगरने स्क्रिन शेअर केली होती. तिनही भागांना प्रेक्षकांचा दमदार प्रतिसाद मिळाल्यानंतर आता प्रेक्षकांच्या भेटीला चौथा भाग येणार आहे. ‘बाघी’च्या सर्वच फ्रेंचायझीची निर्मिती निर्माते साजिद नाडियाडवाला यांनी केली आहे. ‘बाघी ४’ चित्रपटात कोणकोणते कलाकार असणार, अद्याप हे गुलदस्त्यातच आहे. चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियादवालाच करणार असून दिग्दर्शन ए. हर्षा करणार आहेत. चित्रपट ५ सप्टेंबर २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.